‘बार बार देखो’ हा सिनेमा बॉलिवूडमध्ये अनेक कारणांसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी जे काही वर्षांनुवर्षे चालत आलेले नियम आहेत ते या सिनेमाने अजिबात पाळले नाहीत. याउलट ते स्वतःचे नवनवीन नियमच तयार करत आहेत. सिनेमाची लोकप्रियता ही ट्रेलर प्रदर्शित होण्याच्या आधीच सुरु झाली होती. या सिनेमाने पहिल्यांदी पोस्टर आणि गाणे प्रदर्शित केले. तेव्हा पासूनच प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची चर्चा व्हायला सुरुवात झाली होती.
सुत्रांच्या मते, ‘बार बार देखो’चे निर्मात्यांनी ‘सैराट’ सिनेमाचे प्रसिद्धी तंत्र वापरले. सैराटनेही सिनेमाच्या ट्रेलरच्याआधी सिनेमातले गाणे प्रदर्शित केले होते. त्यातही गाणे प्रदर्शित करण्यापूर्वी गाण्याचे पोस्टर आणि टिझर प्रदर्शित केला होता. त्यानंतरच गाणे प्रदर्शित केले होते. यामुळे लोकांमध्ये सिनेमाबद्दलची उत्सुकता कायम राहायला मदत झाली. या आपल्या अनोख्या प्रसिद्धी तंत्रामुळे सैराटने केवळ मराठीमध्येच नाही तर हिंदी सिनेमांच्या अनेक मोठ्या सिनेमांच्या मांदियाळीत ‘सैराट’ सिनेमाचे नाव समाविष्ट झाले. बार बार देखो हा सिनेमाही सैराटच्या पाऊलांवर पाऊल टाकत त्यासारखेच प्रसिद्धी तंत्र वापरत आहे. या सिनेमानेही त्यांचे गाणे पहिल्यांदी प्रदर्शित केले आणि नंतर सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला. आतापर्यंत ‘बार बार देखो’ची सगळीच गाणी हिट ठरली आहेत.
‘बार बार देखो’च्या फर्स्ट लूकनंतर काही दिवसातच ‘काला चश्मा’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. यात कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्राचा दमदार डान्स परफॉमन्स दिसतो. यानंतर सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. याचा फायदा म्हणजे तोपर्यंत या सिनेमाबद्दल अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. सिनेमातले गाणे जर एवढे चांगले असेल तर ट्रेलर कसा असेल याबद्दल उत्सुकता वाढत गेली. ज्याचा फायदा हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर झाला. अनेक दिवस हा ट्रेलर ट्रेंडिंगमध्ये होता.
९ सप्टेंबरला ‘बार बार देखो’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. नित्या मेहराने या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून धर्मा प्रोडक्शन आणि एस्सेल एण्टरटेनमेन्टने या सिनेमाची निर्मिती केली आहे.