Kamal Haasan Birthday: १९८७ मध्ये आलेल्या ‘मिस्टर इंडिया’ने प्रेक्षकांना भुरळ घातली, ९० च्या दशकात ‘छोटा चेतन’ने ३डी चित्रपटातून एक वेगळं विश्व उभं केलं, अन् त्यानंतर लगेचच आलेल्या ‘चाची ४२०’ या चित्रपटाने मात्र काही वेगळे मापदंड चित्रपटसृष्टीत घालून दिले. पाहायला गेलं तर असे प्रयोग याआधीही झाले होते परंतु ९० च्या दशकातील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक बेंचमार्क ठरला तो कायमचा. पती पत्नीच्या घटस्फोटामुळे भरडली जाणारी चिमूरडी मुलगी अन् तिच्याभोवती रचलेलं साधं कथानक. पण तरी त्या कथानकाला दिलेली विनोदाची फोडणी, मेकअपच्या माध्यमातून केलेला नवा प्रयोग आणि कौटुंबिक मूल्यांशी जोडलेली नाळ याचं योग्य मिश्रण यात पाहायला मिळालं. मी आणि माझ्यासारख्या ९० च्या दशकातील कित्येक मुलांसाठी हा चित्रपट म्हणजे कमल हासन या अभिनयाच्या सागरातील हिमनगाशी झालेली तोंडओळख होता. आज याच हिमनगाला ६८ वर्षं पूर्ण होत आहेत. लक्ष्मी गोडबोले उर्फ चाची म्हणून आमच्या आयुष्यात एंट्री घेतलेलं कमल हासन हे रसायन नेमकं आहे तरी काय हे नंतर ‘वेलू नायकन’, ‘अप्पू राजा’, ‘पुष्पक’, ‘सदमा’, ‘अन्बे सिवम’सारख्या कित्येक चित्रपटांच्या माध्यमातून समजलं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या या ‘उलगनायगन’च्या कारकीर्दीचा आज आढावा आपण घेणार आहोत.

तब्बल ६ दशकं एकहाती मनोरंजनसृष्टीवर राज्य करणाऱ्या, अन् भारतीय चित्रपटांचं जागतिक स्तरावर नेतृत्त्व करणाऱ्या, उलगनायगन कमल हासन यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासूनच अभिनय सुरू केला होता. ७ नोव्हेंबर १९५४ या दिवशी एका तमिळ ब्राह्मण कुटुंबात कमल यांचा जन्म झाला. कमल यांचे नाव सुरुवातीला पार्थसारथी असे ठेवण्यात आले होते, नंतर त्यांच्या वडिलांनी ते बदलून कमल हासन केले. वडील, भाऊ आणि बहीण तिघांनाही कला आणि साहित्याची प्रचंड आवड होती आणि तीच कमल हासन यांच्यातही आपसूक आलीच. वयाच्या चौथ्या वर्षी ‘कलथूर कन्नम्मा’ या चित्रपटात कमल हासन यांनी प्रथम काम केलं अन् यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्ण पदकही मिळालं. त्यानंतर मात्र कमल यांनी मागे वळून पाहिलं नाही. सहा वर्षाचा होईस्तोवर आणखी पाच चित्रपटात कमल यांना बालकलाकार म्हणून काम मिळालं. शालेय शिक्षण आणि कला असं एकत्र संभाळत त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले अन् नाटकात प्रचंड रुचि असल्याने यादरम्यान कमल हासन यांना ‘मेक-अप’मध्ये प्रचंड आवड निर्माण झाली अन् त्यांची हीच आवड आजही त्यांच्या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळते.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

आणखी वाचा : Indian 2 Intro: २६ वर्षांनी पुन्हा भ्रष्टाचाराशी दोन हात करणार कमल हासन; बहुचर्चित ‘इंडियन २’चा टीझर समोर

बालकलाकार म्हणून काम मिळणं ही फार वेगळी गोष्ट अन् या क्षेत्रात येऊन काम मिळवणं हा एक वेगळा संघर्ष असतो जो कमल हासन यांच्याही वाट्याला आला. सर्वप्रथम एका प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शकाकडे सहाय्यक म्हणून काम करत कमल हासन यांनी चित्रपटात छोट्या छोट्या भूमिका करायला सुरुवात केली. के.बालाचंदर यांच्या १९७५ साली आलेल्या ‘अपूर्व रागंगल’ हिंदीत ‘अप्पू राजा’ या चित्रपटाने कमल हासन यांना पहिला ब्रेक दिला अन् चित्रपटसृष्टीला आपली दखल घ्यायल भाग पाडलं. या चित्रपटाने कमल हासन यांना लोकप्रियता मिळालीच याबरोबरच त्यांना फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. कमल के.बालाचंदर यांना आपलं गुरु मानतात, त्यांनी एकत्र ३० हून अधिक चित्रपट दिले आहेत.

तब्बल सहा दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या ‘उलगनायगन’ने आजवर सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये मिळून २३० हून अधिक चित्रपटात काम केलं आहे. अतिशयोक्ति नव्हे पण सिनेमा या शब्दाचा समानार्थी शब्दच कमल हासन असं बरेच लोक मानतात. अभिनय, दिग्दर्शन, लेखन, निर्माते, पार्श्वगायन, गीतकार, नृत्य दिग्दर्शन व नर्तक अशा विविध कलागुणांनी समृद्ध असं कमल हासन यांचं व्यक्तिमत्त्व हे हिमनगासारखंच आहे, ज्यांचा फक्त अभिनय प्रथमदर्शी लोकांना दिसतो, पण त्याहीपलीकडे दडलेला हरहुन्नरी कलाकार हा प्रत्येकालाच ठाऊक आहे असं नाही. कमल हासन यांनी चित्रपटातून भरपुर मनोरंजन तर केलंच, याबरोबरच त्यांच्या बहुतांश चित्रपटाच्या क्लायमॅक्सने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणीदेखील आणलं. ‘कडल मिनगल’, ‘पुष्पक’, ‘सदमा’, ‘स्वाती मुथ्यम’, ‘नायकन’, ‘अन्बे सिवम’, ‘आळवंधन’, ‘सथ्या’, ‘एक दुजे के लीये’ अशा कित्येक चित्रपटातून कमल यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर गारुड केलं. नंतर ‘हे राम’, ‘दशावतार’, ‘विश्वरूपम’, ‘इंडियन’सारख्या चित्रपटातून कमल यांनी स्वतःला एका वेगळ्या साच्यात बसवलं अन् प्रेक्षकांनी तेसुद्धा डोक्यावर घेतलं अन् आता आपल्या सेकंड इनिंगमध्ये कमल यांनी पुन्हा ‘विक्रम’ आणि आगामी ‘इंडियन २’सारख्या चित्रपटातून स्वतःला रीइनव्हेंट केलं आहे.

कमल हासन हे असे एकमेव अभिनेते आहेत ज्यांचे एकूण ७ चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आले आहेत. इतकंच नव्हे तर २००० साली कमल हासन यांना ‘इंडियन’ या चित्रपटासाठी १९ वा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर त्यांनी चक्क फिल्मफेअर समितिला पत्र लिहून त्यांना आता पुढे पुरस्कार न देण्याची विनंतीही केली. १९८८ ते १९९८ यादरम्यान कमल हासन हे सर्वात जास्त मानधन घेणारे तमिळ अभिनेते होते, तर १९९४ मध्ये सर्वप्रथम एका चित्रपटासाठी एक कोटींचं मानधन घेणारे पहिले अभिनेतेदेखील कमल हासनच होते.

कमल हासन आणि राजकारण :

कमल हासन यांनी त्यांच्या कारकिर्दीत २०१९ च्या ‘विश्वरूपम २’ नंतर एकच मोठा चार वर्षांचा ब्रेक घेतला. यादरम्यान कमल यांनी स्वतः स्थापन केलेल्या ‘मक्कल नीधी मैयम’ या राजकीय पक्षासाठी काम करायला सुरुवात केली. दाक्षिणात्य कलाकार हे राजकारणातही तितकाच सक्रिय सहभाग घेतात हे कमल हासन यांनीही दाखवून दिलं. राजकीय पक्ष स्थापन करून व राजकारणात सहभागी होऊनसुद्धा कमल यांच्या फिल्मी करिअरवर अजिबात परिणाम झाला नाही. राजकारणात कमल हासन यांना फारसं यश मिळालं नसलं तरी त्यांनी निवडणुकीदरम्यान प्रचारातून, भाषणातून, आपल्या सोशल मीडिया अकाऊंटमधून त्यांचं नेमकं ध्येय लोकांसमोर मांडण्याचा त्यांनी कायम प्रयत्न केला.

kamal-haasan2
फोटो : इंडियन एक्सप्रेस

राजकीय विचारधारा वेगळी असल्याने कमल हासन यांच्यावर बरीच टीकाही झाली. बऱ्याच वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना लोकांचा रोष पत्करावा लागला. “स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हा हिंदू होता व त्यांचं नाव होतं नथुराम गोडसे” हे कमल हासन यांचं वक्तव्य चांगलंच चर्चेत होतं. पुलवामा हल्ल्यादरम्यानसुद्धा कमल हासन यांचं एक जुनं वक्तव्य चांगलंच व्हायरल झालं होतं. २०१८ मध्ये ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधताना ‘जानवं’ या ब्राह्मण समाजाच्या पवित्र अशा गोष्टीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं ज्यामुळे त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. याबरोबरच आपली मुलगी अक्षरा व श्रुती यांच्या शाळेच्या दाखल्यामध्ये जात व धर्म याठिकाणी काहीही माहिती न लिहिल्याबद्दलही कमल हासन यांनी उघडपणे भाष्य केलं होतं. कमल हासन हे भाजपा तसेच मोदींच्या विरोधात आहेत असेही आरोप बऱ्याचदा त्यांच्यावर झालेले आहेत. यावर मध्यंतरी ‘इंडिया टूडे कॉनक्लेव्ह’च्या समारंभात कमल यांनी उत्तर देत या गोष्टीवर पडदा टाकला. कमल म्हणाले, “मी लोकविरोधी असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या विरोधात आहे.”

आणखी वाचा : राही अनिल बर्वे: भीतीने वाचा फुटलेला मुलगा ते ‘तुंबाड’द्वारे सिनेमाची भाषा बदलणारा दिग्दर्शक

कमल हासन यांच्या या राजकीय भूमिकांमुळे, बेधडक वक्तव्यामुळे त्यांच्या चित्रपटांच्या बाबतीतही बऱ्याच अडचणी आल्या आहेत. इतकं होऊनसुद्धा अजूनही या सुपरस्टारबद्दलची क्रेझ कायम आहे. आजही पडद्यावर अॅक्शनपासून इमोशनपर्यंत प्रत्येक बाबतीत कमल हासन यांचं काम चोख आहे. आजच्या पिढीलाही ते तितकेच आपलेसे वाटतात. आजची पिढीसुद्धा त्यांच्या ‘पुष्पक’, ‘नायकन’सारख्या चित्रपटातून धडे घेत आहे. राजकीय विचारधारा काहीही असली तरी प्रेक्षकांचं कमल हासन यांच्यावरील प्रेम तसुभरही कमी झालेलं नाही हे आपण ‘विक्रम’मधून पाहिलं. याचीच पुनरावृत्ती आता आगामी ‘इंडियन २’मधून आपल्याला पाहायला मिळेल. अभिनयाच्या या महासागरात कित्येक तुफानांना तोंड देत प्रेक्षकांच्या मनातील स्थान ढळू न देता घट्ट पाय रोवून उभ्या असलेल्या कमल हासन नामक हिमनगाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.