dilip-thakurसुरुवातीलाच असं म्हटलं की, मध्यमवयीन मराठी चित्रपट तारुण्यात आला हो… तर तुमच्या भुवया नक्कीच उंचावतील. पण जर असे म्हटले की, कसदार कथा मराठी चित्रपटाची खरी ओळख व ताकद असून आता त्यात मोठ्याच प्रमाणात ‘तरुणांचे विश्व’ दिसते आहे. लगोलग तुमच्या डोळ्यासमोर चि. व चि. सौ. का, एफयू, मुरांबा, टीटीएमएम (तुझं तू माझं मी), गुलाब जाम, रुबिक्स क्यूब, रॉकी, लव्ह बेटिंग अशा ताज्या तरुण चित्रपटांची नावे नक्कीच आली असतील. साधारण एकाच वेळेस इतके तरुण चित्रपट प्रदर्शनास सज्ज होणे हे पहिल्यांदाच घडतंय. तसे अधूनमधून तरुण चित्रपट मराठीत येत असतात. बालक पालक, टाईमपास (पहिला व दुसरा), दुनियादारी, प्यारवाली लव्ह स्टोरी, तुझी माझी लव्ह स्टोरी…. वर्षभरात प्रदर्शित होणार्‍या नव्वद शंभर मराठी चित्रपटात दोन चारच तरुण चित्रपट हे प्रमाण फार उल्लेखनीय आहे, असे नाहीच. आता प्रश्न असा आहे की, मराठी चित्रपट अधूनमधून तारुण्यात असतो तर मग तो नेमका असतो कसा? कसदार प्रभावी गोष्ट हे मराठी चित्रपटाचे खास वैशिष्ट्य असले तरी त्यात प्रामुख्याने चाळीशीपार समाजाचे प्रतिनिधित्व केले जाते असे लक्षात येईल. १)सामाजिक कौटुंबिक, (बरेचसे नायिकेची त्यागी, सोशिक वृत्ती दाखवणारे जास्त) २) विनोदी (विशेषत: एकीकडे पुणेरी, नंतर दादा कोंडकेंचे द्विर्थी), ३) ग्रामीण (त्यात प्रामुख्याने तमाशाप्रधान चित्रपट) तीन प्रकारच्या मराठी चित्रपटांनी दीर्घकालीन वाटचाल केलीये व त्याबाबत मराठी चित्रपटावर निस्सीम प्रेम करणार्‍या पारंपरिक प्रेक्षकांचीही तक्रार नव्हती. त्या काळात मराठी चित्रपटाचा नायक ३०-३५ पार केलेलाही चालत असे. आशयाच्या बाबतीत जब्बार पटेल, राजदत्त, स्मिता तळवलकर, अमोल पालेकर, सुमित्रा भावे, सुनील सुखटणकर या दिग्दर्शकांनी मराठीची चौकट मोडली/बदलली. याचा अर्थ मराठी चित्रपट तरुण करण्याचा प्रयत्न झालाच नाही असे नाही. महेश कोठारे व सचिन पिळगावकर यांच्या कॉमेडीपटाच्या लाटेत ‘नवचैतन्य’ आले. गंमत जमंत (१९८७), अशी ही बनवाबनवी (१९८८) तरुण चित्रपटच. पण त्यानाही किती वर्षे झालीत बघा. एव्हाना दोन अडीच पिढ्या काळ पुढे सरकलाय, मुंबईसारखे शहर केवढे तरी विस्तारलय/ बदललंय. जणू पंचतारांकित झालंय. तरुण ‘यंगस्टर्स’ म्हणून ओळखले जातात. राज्यातील अनेक छोटी शहरे मोठी झाली. तालुक्याची ठिकाणे निमशहरी झाली. मोबाईल क्रांती, सोशल नेटवर्किंग यामुळे ‘युथचे लाईफ, अॅपिअरन्स, अॅप्रोच व फोकस’ बदललाय. त्यांच्या मराठी बोलीत असे हिंदी, इंग्लिश शब्द सहज रुळलेत. अगदी पंजाबी, गुजराती शब्दही आजचा मराठी युथ सहज बोलतोय. यासह मैत्री व प्रेम याच्या नातेसंबंधाबाबत तो कन्फ्युजही आहे. हे नवे भावविश्व मराठी चित्रपटाच्या पडद्यावर येणे गरजेचे आहे ना? ‘सैराट’देखील तसा तरुणच चित्रपट. पण ग्रामीण विश्व व मानसिकता दाखवणारा.

आता साधारण एकाच वेळेस आजच्या शहरी युथचे लाईफ साकारणारे चित्रपट आल्यानेच आजचा मल्टिप्लेक्स प्रेक्षक त्याला जोडला जाईल. हे अत्यंत स्वाभाविक आहे. त्याला या तरुण चित्रपटात आपले कॉलेज लाईफ, मैत्रीतील खरेपणा वा फोलपणा, ही मैत्री आहे की प्रेम यातला मानसिक गोंधळ, पालकांना या नात्याची कशी बरे ओळख करून द्यावी याचे कन्फ्युजन, या नवीन पिढीचे काहीच कळत नाही असा पालकांचा त्रागा हे आजच्या चित्रपटात येणे गरजचेही. हेच आजचे खूप मोठे वास्तव आहे. लिव्ह इन व घटस्फोटाचे वाढते प्रमाण हे देखील आजचेच लाईफ आहे. त्याचा आपापल्या पद्धत व शैलीत वेध घेण्याचा प्रयत्न म्हणजेच आजचा तरुण चित्रपट होय. तेच आता मराठीच्या पडद्यावर दिसतेय हेच नवे वळण होय. त्याच वेळेस इतरही अनेक प्रकारचे मराठी चित्रपट येतच राहणार. प्रियांका चोप्रा ‘रास्कला’ नावाच्या मनोरंजक मराठी चित्रपटाची निर्मिती करतेय. तिच्याच ‘व्हेन्टिलेटर’ मध्ये दिग्दर्शक राजेश म्हापुसकरने इस्पितळातील वातावरणावर हसत खेळत चित्रपट साकारला. त्याला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. सुमित्रा भावे व सुनील सुखटणकर दिग्दर्शित ‘कासव’ने सुवर्णकमळ पुरस्कार पटकावलाय. दशक्रिया, हलाल, लेथ जोशी, रिंगण असे काही वेगळे चित्रपट निर्माण होतच राहणार. एकाच वेळेस अनेक गोष्टींवर चित्रपट निर्माण होत राहणे ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. पण त्यात ‘तरुणांच्या चित्रपटाचे सातत्य हवे’ होतेच. प्रत्येक पिढीतील रसिकांसमोर हिंदीतील तरुण चित्रपट होते पण मराठीत त्याचा अभाव होता. हिंदीसारखी मोकळी ढाकळी प्रणय दृश्ये व विदेशात चित्रीकरण मराठीला परवडत नाहीत (सेन्सॉर मराठीतील प्रेमिकांची मिठी कात्रीत पकडते, नायिकेचे शॉर्टस त्याना चालत नाही. ते आपले कल्चर नव्हे. प्रेक्षक सहकुटुंब मराठी चित्रपट पाहायला जातो अशी कारणे असत) असे म्हणतच मराठी चित्रपट तारुण्यापासून शक्य तितक्या दूर असे. आताच्या तरुण कलाकारांच्या व्यक्तिमत्व व अभिनय या दोन्हीत छान धिटाई आलीय. शॉर्टसमध्ये स्वीट दिसता येते याचे आजच्या नेहा महाजन, संस्कृती बालगुडे, पूजा सावंत इत्यादींत सकारात्मक भान आहे. आजचे पटकथाकार व दिग्दर्शक युथची भाषा/ स्वभाव/ दृष्टीकोन/ पाहणे/ ऐकणे/ स्वप्ने व महत्त्वाचे म्हणजे मानसिक/ वैचारिक/ भावनिक गोंधळ समजून घेऊ लागलेत… मराठी चित्रपट तारुण्यात आलाय हे आता तरी तुम्हाला पटतंय ना?
– दिलीप ठाकूर

Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
cannes film festival, FTII, short film,
प्रतिष्ठित कान चित्रपट महोत्सवात पुण्याच्या एफटीआयआयचा लघुपट
Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…