सुरुवातीपासूनच वाद आणि आरोप- प्रत्यारोप झाल्यानंतर संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटाला सेन्सॉरने प्रमाणित केले. त्यामागोमागच सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा हा चित्रपट देशातील सर्व राज्यांमध्ये प्रदर्शित करण्याचे आदेश दिले. चित्रपटाला होणारा विरोध आणि सद्यपरिस्थिती पाहता चित्रपट निर्मात्यांनी सावधगिरीचे पाऊल उचलत ‘घुमर’ या गाण्याचे नवे व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आणले.

राणी पद्मावती ‘घुमर’ करत असतानाच्या प्रसंगाचे चित्रण असणाऱ्या या गाण्यात पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या दीपिका पदुकोणची कंबर दिसल्यामुळे करणी सेनेसोबतच जयपूरमधील शाही कुटुंबाने विरोध दर्शवला होता. त्यामुळेच सेन्सॉरने त्यासंबंधीचा बदलही चित्रपटाच्या टीमला सुचवला होता. किंबहुना ज्या दृश्यांमध्ये दीपिकाची कंबर दिसतेय ते दृश्यच गाण्यातून वगळण्याची विचारणा करण्यात आली होती. पण, तसे केल्यास संपूर्ण गाणे बिघडेल, असे कारण देत सीजीआयच्या माध्यमातून बदल करत दीपिकाची कंबर झाकण्यात आली.

‘मंक’चा प्याला प्यायलेल्या संजय मिश्राला पाहिलात का?

‘घुमर’ गाण्याचे हे नवे व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर क्षणार्धातच सोशल मीडियावर त्याविषयीच्या चर्चांना उधाण आलं. ‘संस्कारी असणारी आणि संस्कारी नसणारी दीपिका’, असं म्हणत काही ट्विटर युजर्सनी या बदलाची खिल्ली उडवली. तर काही चाहत्यांनी सोशल मीडियाच्याच माध्यमातून या बदलाविषयी संताप व्यक्त केला. ‘दीपिकाची कंबर डिजिटली झाकली गेली आहे तर मग…’ असं म्हणत काहींनी उपरोधिक ट्विटही केले. गाण्यात करण्यात आलेला हा बदल नेमका आपल्या विचारसणीला आणि समाजाला काय सांगू इच्छितो असे प्रश्नही अनेकांनीच उपस्थित केले. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आता अवघे काही दिवस राहिले असतानाच भन्साळींसमोर उभ्या ठाकणाऱ्या या अडचणी आतातरी कमी व्हाव्यात अशीच चाहत्यांची अपेक्षा आहे.