अभिनेत्री जया बच्चन यांना त्यांच्या अभिनयाबरोबर रागीट स्वभावासाठीही ओळखले जाते. त्या सातत्याने चिडचिड करताना, पापाराझींवर भडकतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांचे फोटो घेणाऱ्या, त्यांच्याबरोबर फोटो काढू इच्छिणाऱ्या चाहत्यांना अनेकदा त्या फटकारताना दिसतात. दरम्यान, एका कार्यक्रमात जया बच्चन यांनी पुन्हा एकदा ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

अमिताभ व जया बच्चन यांच्याप्रमाणे त्यांची नात नव्या नवेली नंदाही नेहमीच चर्चेत असते. नव्याचा चाहतावर्गही मोठा आहे. नव्या अभिनय क्षेत्रापासून लांब असली तरी सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ती चाहत्यांना अपडेट देत असते. आता नव्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकताच तिचा पॉडकास्ट शो ‘व्हॉट द हेल नव्या’चा दुसरा सीझन प्रदर्शित झाला. या कार्यक्रमात नव्याची आजी म्हणजे अभिनेत्री जया बच्चन व आई श्वेता नंदा यांनी हजेरी लावली होती.

हेही वाचा- Deepika Padukone: लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका पदुकोण-रणवीर सिंहने दिली गुडन्यूज, ‘या’ महिन्यात करणार बाळाचं स्वागत

दरम्यान, या कार्यक्रमामध्ये जया बच्चन यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. या पॉडकास्टमध्ये नव्याने जया बच्चन यांना विचारले, “सोशल मीडियावर नकारात्मक कमेंट्सवर लोकांच्या सर्वांत जास्त प्रतिक्रिया येतात. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे?” या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, “जर तुम्हाला कमेंट करायची असेल, तर सकारात्मक करा. पण, तुम्हाला तर तुमचा निर्णयच ऐकवायचा असतो”.

हे ऐकून नव्या त्यांना म्हणाली, “जर त्या लोकांना तुमच्यासमोर बसवलं, तर ते बोलू शकतील का?”, त्यावर जया बच्चन म्हणाल्या, “त्यांची हिंमत तरी होईल का समोर बसून बोलण्याची. हिंमत असेल, तर खऱ्या गोष्टींवर बोलून दाखवा. तुमचा चेहराही समोर येऊ दे”

हेही वाचा- आर्यन खानच्या अटकेनंतर जातीवरून केलं लक्ष्य, भ्रष्टाचाराचे झालेले आरोप; समीर वानखेडे म्हणाले, “प्रत्येक गोष्टीचा संबंध…”

‘व्हॉट द हेल नव्या’च्या एपिसोडमध्ये जया बच्चन व श्वेता नंदाने अनेक खुलासे केले आहेत. त्यामध्ये जया बच्चन नव्या आणि श्वेता नंदाला शिव्या देण्यावरून फटकारताना दिसल्या. एवढेच नाही, तर जया बच्चन यांनी लग्नानंतरच्या रोमान्सबाबतही भाष्य केले आहे. “रोमान्सला खिडकीच्या बाहेर काढा. लग्नानंतर रोमान्स संपतो”, असे वक्तव्य त्यांनी केले होते. जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.