बॉलीवूडमधील अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली यांनी अलीकडेच त्यांच्या दुसऱ्या अपत्याचे स्वागत केले. ही बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती आणि कलाकारांनी तसेच चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. अशातच आता विराट आणि लेक वामिकाचा नवीन फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये विराट आणि वामिका एका रेस्टॉरंटमध्ये लंच करताना दिसत आहेत. बापलेकीचा हा फोटो रेडिटवर शेअर करण्यात आला आहे आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोला कॅप्शन देत लिहिले होते, “लंडनमध्ये वामिकासह दिसला विराट!” विराट आणि वामिका एका टेबलवर बसलेले या फोटोमध्ये दिसत आहेत. दोघांनी यात काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहेत. अनेक चाहत्यांनी या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक चाहता म्हणाला, “मला माहीत आहे की, आपण सगळे या दोघांना पाठमोऱ्या बाजूने बघू शकत आहोत, परंतु यात दोघं खूप सुंदर दिसत आहेत. विराट कोहली एक चांगला पिता आणि पती आहे.”

विराट आणि वामिकाच्या या फोटोवर अनेक जणांनी आपली मते मांडली आहेत. रेडिटवर एका युजरने कमेंट करत लिहिले, “विराट आणि वामिका इथे एकत्र वेळ घालवत आहेत, तर दुसरीकडे अनुष्का आणि बेबी अकायबरोबर तिचं नातं घट्ट करत आहेत. परंतु, ज्याने कोणी हा फोटो काढला आहे, त्याने असा लपून फोटो काढायला नको होता.” “वामिका किती मोठी झाली आहे आणि तिची ती पोनीटेल खूप सुंदर दिसत आहे. मला ती लहान अनुष्कासारखीच वाटत आहे”, अशी कमेंट आणखी एका युजरने केली.

हेही वाचा… VIDEO: फेकल्या चपला, दगड अन्…; अक्षय कुमार-टायगर श्रॉफच्या कार्यक्रमात चाहत्यांचा मोठा गोंधळ; पोलिसांकडून लाठीचार्ज

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने दोन आठवड्यांपूर्वी अकायच्या जन्माची बातमी दिली. त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक नोट शेअर करून लिहिले, “अत्यंत आनंदाने आणि प्रेमाने भरलेल्या अंतःकरणाने आम्हाला सर्वांना हे सांगताना आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या लहान मुलाचे अकाय आणि वामिकाच्या लहान भावाचे या जगात स्वागत केले. आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात आम्हाला तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळाव्या अशी सदिच्छा आहे. प्रेम आणि आभार. विराट आणि अनुष्का.”

दरम्यान, विराट आणि अनुष्का ११ डिसेंबर २०१७ मध्ये इटलीमध्ये लग्नबंधनात अडकले. ११ जानेवारी २०२१ रोजी वामिका त्यांच्या आयुष्यात आली. दुसऱ्या प्रेग्नेंसीदरम्यान दोघांनी प्रचंड गुप्तता पाळली होती. अनुष्काच्या कामाबाबत सांगायचं झाल्यास, ‘चकदा एक्स्प्रेस’ या आगामी चित्रपटातून अनुष्का प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. माजी क्रिकेटपटू झूलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. ‘चकदा एक्स्प्रेस’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.