१९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्टार वॉर्स’ या चित्रपटाने प्रेक्षकांचा हॉलिवूडपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला. आज हॉलीवूड म्हटले की उत्तम अ‍ॅनिमेशन, अद्ययावत तंत्रज्ञान आणि जगावेगळ्या कल्पना डोळ्यासमोर येतात. पण याची सुरुवात खऱ्या अर्थाने ‘स्टार वॉर्स’ या चित्रपट मालिकेने केली. भविष्यातील तंत्रज्ञान आणि विज्ञान कथांवर आधारित असलेल्या या चित्रपट मालिकेने विज्ञानपटांचा एक ट्रेंड हॉलीवूडमध्ये सुरू केला. बॉलीवूडमधील ‘गब्बर सिंह’, ‘मोगँबो’ यांसारखीच लोकप्रियता या चित्रपटातील व्यक्तिरेखांनी मिळवली आहे. यांतील प्रत्येक पात्रावर एक स्वतंत्र चित्रपट तयार करता येईल. इतके यश मिळवलेली ही सिनेमालिका दिग्दर्शक ‘कोलन ट्रेवॉरो’ यांच्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. चित्रपट निर्माता ‘कॅथलीन केनेडी’ यांनी दिग्दर्शक कोलन यांना ‘स्टार वॉर्स क’मधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मे २०१९ मध्ये प्रदर्शित होणारा हा मालिकेतील ९ वा चित्रपट आहे. निर्मात्यांनी त्यांच्या जागी अद्याप इतर दुसऱ्या कोणाची निवड केली नसली तरी संदर्भात स्पष्टीकरण देऊन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते कोलन हे एक अनुभवी दिग्दर्शक आहेत. परंतु त्यांच्या कल्पना आणि दृष्टिकोन संकुचित असल्यामुळे त्यांचे लेखकांबरोबर वाद सुरू होते. सातत्याने होणाऱ्या या मतभेदांचा परिणाम आगामी चित्रपटांवर होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांना दिग्दर्शक या पदावरून काढण्यात आले आहे. कोलन ट्रेवॉरो यांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी चाहते त्यांचे मत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.