करोना या जीवघेण्या विषाणूने सध्या जगभर धुमाकूळ घातला आहे. करोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मात्र योग्य ती काळजी आणि सुचनांचं पालन केलं तर या जागतिक संकटावर आपण मात करु शकतो. सरकार विविध माध्यमांमधून नागरिकांमध्ये जनजागृती करत असतानाच आता मालिकांमधूनही नागरिकांना सकारात्मक संदेश देण्यात येत आहे. स्टार प्रवाहवरील ‘वैजू नंबर वन’ या मालिकेच्या माध्यमातून सध्या करोनाविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

नुकत्याच सुरु झालेल्या या मालिकेने पहिल्या आठवड्यापासूनच प्रेक्षकांची मन जिंकण्यास सुरुवात केली. पहिल्याच आठवड्यात दमदार ओपनिंग मिळालेल्या या मालिकेच्या माध्यमातून हाताळलेले हलके फुलके विषय प्रेक्षकांना आवडत आहेत.  त्यामुळेच आता या मालिकेतून करोना विषाणूवर भाष्य करण्यात येणार आहे. लोकांमध्ये पसरलेले समज-गैरसमज या मालिकेतून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

“टेलिव्हिजन हे अत्यंत प्रभावी माध्यम असल्यामुळे करोना विषाणूविषयी असणारे समज गैरसमज आणि त्याचा सामना कसा करायचा हे या मालिकेतून मांडण्याचं आव्हान वैजू नंबर वनच्या टीमने घेतलं आहे. करोनापासून वाचण्यासाठी सध्याच्या घडीला घरात राहणं आणि सरकारी सुचनांचं पालन करणं हेच आपल्या हातात आहे.  अशा परिस्थितीत मनोरंजनाच्या माध्यमातून करोनाविषयी  जनजागृती करण्याची संधी मिळणं ही वैजू नंबर वनच्या संपूर्ण टीमसाठी मोठी गोष्ट आहे. हातात सहज आलेल्या टेक्नॉलॉजीचा वापर अफवा पसरवण्यासाठी न करता योग्य ज्ञान पोहोचवण्यासाठी करावा हा मोलाचा संदेश ‘वैजू नंबर वन’च्या या विशेष भागातून दिला जाणार आहे. कोणत्याही अफवांना बळी पडू नका”, एकत्र मिळून या जागतिक संकटाशी लढूया हे मालिकेतून सांगणार असल्याची प्रतिक्रिया वैजूची भूमिका साकारणाऱ्या सोनाली पाटीलने दिली.