करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने २१ दिवस लॉकडाउन करण्याची घोषणा केली. सरकारने घेतलेल्या या निर्णयाविषयी सध्या नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांच्या मते सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. तर या निर्णयामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचं काय हा प्रश्न उपस्थित करत काहींना या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. परंतु या साऱ्यामध्ये अभिनेत्री दिया मिर्झाने मात्र ज्येष्ठ नागरिकांप्रतीची चिंता व्यक्त केली आहे. ‘जे वयस्क व्यक्ती घरात एकटेच राहतात, त्यांचं या लॉकडाउनमध्ये काय होणार’,असा प्रश्न दियाने उपस्थित केला आहे.दियाने ट्विट करत तिची चिंता व्यक्त केली आहे.

“मी ज्या इमारतीत राहते त्या इमातीतील ८० टक्के लोकं ज्येष्ठ नागरिक आहेत.यापैकी बरेचसे जण घरात एकटेच राहतात. त्यातच पोलीस फळवाले आणि भाजीवाले यांना बाजारात जाण्याची परवानगीही देत नाहीयेत. तसंच ऑनलाइन सेवा पुरवणाऱ्या सुविधादेखील बंद झाल्या आहेत. ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या तर गरजेच्या आहेत ना”,असं दिया म्हणाली.

पुढे ती म्हणते, “ज्येष्ठ नागरिकांचं वय आणि त्यांच्या गरजा पाहून त्यांची काळजी घेण्याची आणि प्रोटोकॉल करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. या संचारबंदीला काही नियमावलींची आवश्यकता आहे. ज्यामुळे निदान भाजीवाले तरी घाऊक बाजारात जाऊन खरेदी करु शकतात. संचारबंदी करण्याची आवश्यकता तर आहेच आणि या आदेशाचा मी आदरही करते. मात्र त्याचा परिणाम जीवनावश्यक गरजांवर होणार नाही ना याची काळजी घेतली पाहिजे”.


दरम्यान,  करोनामुळे देशासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या महारोगाचा संसर्ग झपाट्यानं होतं असल्यामुळे त्याची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे पुढील २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात येणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा करत ही माहिती दिली.