बॉलिवूडमध्ये सध्या विविध चित्रपटांच्या ‘सिक्वल्स’ना उधाण आले आहे. सिनेरसिकांचीही अशा चित्रपटांना अनेकदा पसंती मिळाली आहे. असे असताना आता अभिनेता फरहान अख्तरही एका चित्रपटाचा सिक्वल करणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटाच्या सिक्वलसह फरहान पुन्हा एकदा एका नव्या विषयाला हाताळणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटातून प्रेम, मैत्री यांपलीकडे जात चौकटीपलीकडले कथानक साकारण्यात आले होते. कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती न करता वास्तवाच्या आणि बदलत्या काळाचा अचूक वेध घेत फरहानने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना या अभिनेत्यांना या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये मुख्य भूमिकेत कोणते कलाकार दिसणार याबाबत रसिकांना उत्सुकता लागून राहीली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना, ‘डॉन ३, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा २’ यांसारख्या चित्रपटांच्या सिक्वलच्या चर्चांनंतर मी आता आणखी एका चित्रपटाचा सिक्वल सादर करणार आहे. फार आधीपासूनच मला ‘दिल चाहता है’ या चित्रपटाचा सिक्वल करायचा होता. या चित्रपटासाठी माझ्या डोक्यात विचार सुरु आहेत. पण त्याबाबत तुर्तास आणखी काय बोलावे हे मला सांगता येणार नाही’ असे फरहान म्हणाला.
फक्त फरहान अख्तरच नाही, तर अभिनेता अक्षय खन्नानेही या चित्रपटाचा भाग व्हायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केल्याची चर्चा आहे. फरहानने साकारलेल्या काही हटके भूमिका आणि ‘दिल चाहता है’ या चित्रपटाची लोकप्रियता पाहता या चित्रपटाच्या सिक्वलसाठी अनेकांना उत्सुकता लागून राहीली आहे.