बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा अनेकांना असते. दरदिवशी या इण्टस्ट्रीत नशीब आजमवण्यासाठी शेकडो तरुण तरुणी येतात. पण, हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच येथे यशस्वी होतात. तर काहींच्या वाट्याला उपेक्षा येते. पण बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळावी अशी इच्छा अनेक नवोदित कलाकारांची असते. मात्र पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांज यानं मात्र ही संधी अनेकदा नाकारली आहे.

पंजाबी सिनेमात नाव कमावलेला दिलजीत ‘फिल्लोरी’, ‘उडता पंजाब’ या मोजक्याच चित्रपटांतून हिंदी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि यामागचं कारण त्यानं नुकतंच एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. ‘आपल्याला यापूर्वीही अनेक बॉलिवूड दिग्दर्शकांनी भूमिका देऊ केल्या मात्र पगडीशिवाय काम करण्याची अट त्यांनी समोर ठेवली. या एकमेव कारणामुळेच मी हिंदी चित्रपट नाकारले’ असं दिलजीत एका मुलाखतीत म्हणाला.

‘माझ्या वाट्याला आलेल्या बॉलिवूड चित्रपटाच्या कथा तितक्या प्रभावी नव्हत्या. काहींनी मला कामही देऊ केलं पण त्या भूमिका फक्त आणि फक्त माझ्यासाठी लिहल्या गेल्यात असं नव्हतं, माझ्याऐवजी कोणीही त्यात काम केलं असतं त्यामुळे मी काही बॉलिवूड चित्रपट नाकारले. पण त्याचप्रबरोबर काही दिग्दर्शकांनी पगडीशिवाय काम करण्याची अट माझ्यापुढे ठेवली. पगडी हा माझा अभिमान आहे, पगडी माझी शान आहे. माझ्या भावना पगडीशी जोडल्या गेल्यात त्यामुळे मला या अटी मान्य नव्हत्या त्यामुळे अर्थात मी चित्रपट नाकारले’ असं दिलजीत एका मुलाखतीत म्हणाला.

दिलजीतचा ‘सुरमा’ चित्रपट १३ जुलैला प्रदर्शित होत आहे. हॉकीपटू संदीप सिंगच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाच्या माध्यमातून त्याच्या आयुष्यावर एक प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तापसी आणि दिलजीत दोसांज ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासोबतच हॉकी या आपल्या राष्ट्रीय खेळामध्ये एक काळ गाजवणाऱ्या खेळाडूची अर्थात ‘सूरमा’ची संघर्षगाथा पाहण्याची संधी सिनेरसिकांना मिळणार आहे.