अभिनेता अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर चित्रपटसृष्टीमध्ये त्याची ओळख बनवू पाहात आहे. २०१६ मध्ये ‘मिर्झिया’ या चित्रपटाद्वारे हर्षवर्धनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण, हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात अपयशी ठरला होता. चित्रपटाच्या वाट्याला फारसे यश आले नसले तरीही हर्षवर्धन कपूरच्या चाहत्यांचा एक वेगळाच वर्ग तयार झाला असे म्हणायला हरकत नाही. ‘मिर्झिया’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारसे चांगले प्रदर्शन केले नाही. पण, हर्षवर्धनच्या अभिनयाला मात्र अनेकांनी दाद दिली होती.

‘मिर्झिया’मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी हर्षवर्धन कपूरला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष) या विभागातील पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. पण, दिलजीत दोसांजला उडता पंजाब या चित्रपटातील भूमिकेसाठी या पुरस्काराने गौरविण्यात आले आणि हर्शवर्धनने नाराजीचा सूर आळवला. ‘मला फिल्मफेअर व्यतिरिक्त इतर सर्व पुरस्कार मिळाले आहेत. काही पुरस्कारांमध्ये ज्युरी पुरस्कारांसंबंधीचे निर्णय घेतात. काही ठिकाणी लोकप्रियतेच्या निकषांवर हे ठरवले जाते. मला नाही ठाऊक या वर्षी त्यांनी हा निर्णय नेमका कसा घेतला आहे. माझ्यामते पदार्पणासाठीचा पुरस्कार हा अगदी नवख्या कलाकारालाच देण्यात यावा. मी खूप कमी चित्रपटांमध्ये काम केले आहे. दुसरीकडून असेही म्हटले जाऊ शकते की, मी १०० इंग्रजी चित्रपट केले आहेत आणि आता मी हिंदी चित्रपट करत आहे. त्यामुळे हे माझे पदार्पणच आहे. तर मग लिओनार्दो दिकेप्रियोने ऑस्कर जिंकल्यानंतर तो बॉलिवूडकडे वळला तर ते त्याचे पदार्पणच असेल. ही गोष्टच मला पटत नाही’, असे ठाम मत हर्षवर्धनने मांडले असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केले आहे.

फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये मिळालेल्या अपयशाबद्दल सांगताना हर्षवर्धन म्हणाला की, ‘भावेश जोशीच्या चरित्रपटासाठी मी यंदाच्या वर्षी चित्रिकरणास सुरुवात करणार आहे. या क्षेत्रामध्ये तुम्ही जसजसे पुढे जाता तसतसे तुमचे अभिनय कौशल्य आणखीनच बहरत असते. पण, सरतेशेवटी जर तुमच्या कामाच्या (अभिनयाच्या) माध्यमातून तुम्हाला इतरांपर्यंत पोहोचता आले नाही तर इतरांना त्याबद्दल काय वाटेल याचा विचार तुम्ही करु शकता.’ यापुढे हर्षवर्धन म्हणाला, ‘आता जेव्हा भावेश जोशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल त्यावेळी प्रेक्षकांना या चित्रपटातील मुख्य भावना कळू शकतील. कारण, हा एक वास्तवदर्शी चित्रपट आहे. ही बाब खरी आहे की, पुरस्कार न मिळाल्यामुळे मी हताश झालो आहे. पण, मी हा पुरस्कार पुन्हा जिंकेन’, असे हर्षवर्धन म्हणाला.

काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ६२ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये पंजाबी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक-अभिनेता दिलजीत दोसांज याला सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष) या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘उडता पंजाब’ या चित्रपटासाठी दिलजीतला हा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांजने यापूर्वी ‘पंजाब १९८४’, ‘जाट अॅन्ड ज्युलिअट’, ‘सरदारजी- भाग १, २’, ‘अम्बरसरिया’ यांसारख्या पंजाबी चित्रपटांतून वेगळ्या धाटणीचा अभिनय सादर केला आहे. दिलजीतच्या चित्रपटांप्रमाणेच त्याची गाणीही चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. सध्या हा पंजाबी सुपरस्टार बॉलिवूडमध्ये स्थिरावू पाहात आहे. तो लवकरच अनुष्का शर्मासोबत ‘फिल्लौरी’ या चित्रपटातून झळकणार आहे.