शिवरायांचे पराक्रम, त्यांची यशोगाथा हा कायमच आपल्यासाठी अभिमानाचा आणि तितकाच कुतूहलाचाही विषय राहिला आहे. महाराजांची युद्धनीती, त्यांचे संघटन कौशल्य आणि गनिमी काव्याच्या जोरावर फत्ते केलेल्या अनेक मोहिमा हा सारा इतिहास माहिती असला तरी त्या प्रत्येक मोहिमेचे, महाराजांच्या अनेक निर्णयांचे आपले असे पैलू आहेत. जे अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेली नाहीत. महाराजांचा गनिमी कावा आपल्याला माहिती आहे, पण त्यांनी केलेल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राइकची गोष्ट  ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटातून मांडली आहे, असं सांगत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि कलाकार मृणाल कुलकर्णी, हरीश दुधाडे, मृण्मयी देशपांडे, अजय पूरकर यांनी शिवकालीन इतिहासापासून ते मराठी चित्रपट प्रदर्शनापर्यंत अनेक गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

‘जिजाऊंची महत्त्वाकांक्षा आकर्षित करते’

जिजाबाईंची भूमिका ही माझी आवडती आहे. तेव्हा सर्व मराठी सरदार निजाम, मुघल आणि आदिलशहाकडे नोकरी करायचे. स्वराज्य व्हावे यासाठी कोणीच आग्रही नव्हते. परकीयांनी सत्तेच्या बळावर संपत्ती लुटायची आणि आपल्याच नागरिकांनी त्यांच्याकडे चाकरी करत कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करायचे, याविषयी जिजाऊंना भयंकर चीड निर्माण झाली. स्वत:चे राज्य स्थापन करण्याची जबरदस्त महत्त्वाकांक्षा या स्त्रीमध्ये होती. शिवाजी महाराजांच्या माध्यमातून स्वराज्य स्थापनेचे स्वप्न त्यांनी पहिले. आणि त्याप्रमाणे त्यांना घडवलं, संस्कार केले. त्यांची ही महत्त्वाकांक्षा मला सर्वात जास्त आकर्षित करते. शिवाय, राजगडावर राहून राज्यकारभार पाहणं, स्वराज्यासाठी नवीन माणसं जोडणं, नवी पिढी घडवणं तसंच तरुण लोकांना प्रोत्साहित करण्याची जबाबदारी जिजाऊंवर होती. सध्या मराठी भाषेच्या पाठय़पुस्तकातून शिवरायांचा इतिहास वगळण्याचा विचार होऊ  लागला असताना चित्रपटाच्या माध्यमातून हा इतिहास सांगण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

-मृणाल कुलकर्णी , अभिनेत्री

‘जगभरातील युद्धतंत्राची पाळेमुळे शिवचरित्रात’

‘फत्तेशिकस्त’मध्ये शिवाजी महाराजांनी केलेल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राइकची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे. उत्कृष्ट युद्धनीतीच्या आधारे शिवरायांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोटे कापली होती. जगभरातील युद्धतंत्राची पाळेमुळे शिवचरित्रात अभ्यासायला मिळतात. सध्या हेरगिरी आणि युद्धासाठी अनेक देश प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करतात. कोणत्याही प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग न करता नियोजन आणि युद्धतंत्राच्या साहाय्याने महाराजांनी शत्रूला सळो की पळो करून सोडले होते. गेल्या काही वर्षांत ‘सर्जिकल स्ट्राइक’ या शब्दाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे, मात्र महाराजांनी हा प्रकार सोळाव्या शतकात प्रत्यक्षात घडवून आणला होता. त्या वेळी पुण्यात मुघलांचे एक लाख सैन्य तळ ठोकून बसले होते, ते रयतेवर अनन्वित अत्याचार करत होते, मराठय़ांचा मुलूख बेचिराख करत होते. अशा परिस्थितीत सैन्यातील केवळ तीस माणसांनी लाल महालात शिरून वीस मिनिटांच्या कालावधीत मुघल सैनिकांना कंठस्नान घातले. शाहिस्तेखानाला धडा शिकवण्यासाठी खेळली गेलेली ही खेळी शिवरायांच्या उत्तम व्यवस्थापकीय आणि संघटन कौशल्याचे उदाहरण आहे. यामुळेच मुघल सैन्य पुणे सोडून दिल्लीत पळाले. ही गोष्ट तपशीलवार या चित्रपटात पाहायला मिळेल. मी मुळात इतिहासप्रेमी आहे आणि मला आजोबांकडून ही प्रेरणा मिळाली. लहानपणी आजोबा सावरकर, शिवाजी महाराज यांच्या गोष्टी सांगायचे. या महान पुरुषांच्या कार्याने मी  प्रभावित झालो. पुढे दिग्दर्शनाकडे वळल्यावर इतिहासातील गोष्टी पडद्यावर आणायचे निश्चित केले. ‘र्फजद’ या पहिल्या चित्रपटात कोंडाजी र्फजद, तर ‘फत्तेशिकस्त’मध्ये  स्वराज्याच्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची कथा मांडण्यात आली आहे. शिवचरित्राच्या मालिकेतील हे दुसरे पुष्प असून असे तीन चित्रपट मी करणार आहे. राजगडावर या चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून तेथे चित्रित झालेला हा पहिलाच चित्रपट आहे. संगीत हा उत्तम चित्रपटाचा गाभा असतो. या चित्रपटाचे संगीत देवदत्त मनीषा बाजी यांनी केले असून यामध्ये चौदा गाण्यांचा समावेश आहे. चित्रपटातील तुंबडी ही महाराजांच्या दरबारात शाहिरी सादर करणाऱ्या अज्ञान दास यांचे १७ वे वंशज हरिदास शिंदे यांनी गायली आहे. या चित्रपटात ‘रणी फडकती लाखो झेंडे’ या गाण्यात २०० नर्तक, कार्यकर्ते, ढोलवादक आणि ध्वजधारकांचा समावेश आहे.

– दिग्पाल लांजेकर, दिग्दर्शक

केसरची भूमिकाच वेगळी

मी ‘र्फजद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या दोन्ही चित्रपटांमध्ये मी बहिर्जी नाईकांची मदतनीस असणाऱ्या केसर या मुलीची भूमिका साकारली आहे. शत्रूच्या गोटातील माहिती पोहोचवणे हे जरी तिचे मुख्य काम असले तरी यात तिच्यावर लाल महालातील योजनेची जुळवाजुळव करण्याचीही जबाबदारी दिलेली आहे. योजनेचे नकाशे पाहणे, महालावरील हालचालींची बित्तंबातमी देणे ही केसरची मुख्य कामं आहेत. यात जरा काही चूक झाली तर महाराजांच्या जिवाला धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने तिचे काम अतिशय महत्त्वाचे ठरते. नेहमीच कचकडय़ांच्या बाहुल्या साकारण्यापेक्षा आव्हानात्मक भूमिका साकारायला जास्त मजा येते. ‘आंधळी कोशिंबीर’, ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’ ‘फत्तेशिकस्त’ यातल्या माझ्या भूमिका या माझ्यातील कलाकाराला आव्हान देणाऱ्या होत्या.

– मृण्मयी देशपांडे

बहिर्जीच्या पराक्रमापासून मावळातील भाषेपर्यंत खूप काही शिकलो

मी या चित्रपटात बहिर्जी नाईक यांची भूमिका वठवली आहे. ही भूमिका आव्हानात्मक आहेच, कारण शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा अशी बहिर्जीची ख्याती होती. शत्रूच्या गोटातील खडान्खडा बातमी महाराजांना पोहोचवण्याचे काम नाईक करत होते. शत्रूच्या मुलुखात लोककला सादर करून त्यांच्या हालचाली, डावपेच, पुढील मोहिमा याविषयी माहिती मिळवणे हे जोखमीचे काम होते. या चित्रपटात मी बहिर्जीनी वठवलेल्या नऊ  वेगळ्या पात्रांमध्ये दिसणार आहे.  या भूमिकेसाठी म्हणून खास फारसी उर्दू शिकण्यासाठी मला दिग्पालने खूप मदत केली. मावळातील अनेक नवीन शब्दांचाही परिचय यानिमित्ताने झाला.

– हरीश दुधाडे

कुतूहल होतंच..

रुपेरी पडद्यावर नरवीर तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारताना त्यांचे वागणे, जीवनशैली कशी असेल? शिवाजी महाराज आणि मालुसरे यांच्यातील संभाषण कसे असेल? याविषयी कुतूहल आणि अनेक प्रश्नही होते. एकदा सिंहगडावर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थानी गेल्यावर मनातील सर्व प्रश्न विचारले. तिथे मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. शिवाजी महाराजांच्या ३०० गलबतांच्या आरमाराचे कामकाज पाहणाऱ्या तानाजींच्या अध्यक्षतेखाली कोकणातील अनेक रस्ते बांधण्यात आले आहेत, असे अनेक संदर्भही नव्याने कळले.

– अजय पूरकर