सामाजिक आशय आणि दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न असलेला ‘कोती’ हा सुहास भोसले यांचा चित्रपट ‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पोहोचला आहे. तृतीयपंथी समाजाची व्यथा अत्यंत वास्तविकतेने मांडणारा हा चित्रपट थेट ‘पॅनोरमा’साठी पाठवण्यात आला होता आणि ‘पॅनोरमा’कडून हा चित्रपट ‘कान’ महोत्सवात दाखवण्यात येणार आहे, अशी माहिती सुहास भोसले यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना दिला.
‘कोती’ ही राज दुग्रे या लेखक मित्राची कथा होती. त्याने ती कथा ऐकवली तेव्हाच ती आवडली होती. त्याच वेळी डॉ. साखरेंनी ही कथा ऐकली. तृतीयपंथींना आपण नेहमी मोठेपणी पाहतो. पण त्यांच्या समस्या या लहानपणापासूनच जाणवत असतात. त्यांच्यात स्त्रण्य आहे हे वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक अवस्थांमुळे सहज लक्षात येते. कित्येकदा लहानपणी अशा मुलांना शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तर काहींना केवळ मानसिक समस्या जास्त असतात. डॉक्टर या नात्याने त्यांना ही कथा खरोखर पटली आणि हा चित्रपट करायचे ठरले, अशी माहिती सुहास यांनी दिली. ‘कोती’ या चित्रपटात पहिल्यांदाच लहान मुलांच्या माध्यमातून हा विषय मांडण्यात आला आहे. लहानपणापासूनच या मुलांना काय काय सहन करावे लागते, त्यांच्या आई-वडिलांच्या त्यांच्याप्रति काय भावना असतात, हे या चित्रपटातून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. या विषयावरचा चित्रपट हा बीभत्स, अश्लील किंवा अतिरंजकतेकडे झुकणार अशी भीती अनेकांना वाटत होती. पण दिग्दर्शक म्हणून माझा िपड हा सामाजिक आशयावरच चित्रपट करण्याकडे असल्याने ‘कोती’चा विषय अधिक चांगल्या पद्धतीने लोकांसमोर मांडू शकेन, हा विश्वास होता, असेही ते म्हणाले. या चित्रपटासाठी संदीप गिरी, लक्ष्मी त्रिपाठी यांच्यासारख्यांची मदत झाली. त्यांच्यात राहून त्यांच्या समस्या जाणून घेता आल्या. शिरूरसारख्या ठिकाणी त्यांच्यापकी एकजण शाळेत शिक्षक म्हणून काम करत आहेत. आजूबाजूच्या समाजाने त्यांचा स्वीकार केला आहे. समाजाकडून अशी स्वीकृती त्यांना मिळाली तर त्यांनाही सर्वसामान्यांप्रमाणे नोकरी करून सन्मानाने जगता येईल, हेच या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.
‘कोती’ हे संबोधन आहे. त्या समाजाची ओळख या शब्दात असल्याने चित्रपटासाठी ते नाव सार्थ ठरले, असे सांगणाऱ्या सुहास भोसले यांचा दुसरा चित्रपट ‘रेती’ प्रदर्शनासाठी सिद्ध झाला आहे.