बॉलीवूडमघ्ये काहीही होऊ शकते. एके काळचा सहकलाकार स्पर्धकही होऊ शकतो. याचीच प्रचिती लवकरच तुम्हाला येणार आहे; कारण बॉलीवूडमधले एके काळचे सहकलाकार एकमेकांसमोर आमनेसामने येण्यासाठी तयारीला लागले आहेत. हे कलाकार कोण असतील याचा जरा अंदाज तर लावून पाहा. त्यांची नावं आहेत सुशांत सिंग राजपूत आणि आमिर खान. ‘पीके’मध्ये सुशांतच्या दृश्यांना आमिरने मुद्दामून कात्री लावल्याची चर्चा मसक्कलीने ऐकलीच होती, त्यामुळेच की काय आता तो आमिरशी स्पर्धा करण्यास सज्ज झाला आहे. ‘चंदमामा दूर के’ या चित्रपटात तो अवकाश वैज्ञानिकाची भूमिका साकारणार आहे. आमिरही आगामी ‘सारे जहाँसे अच्छा’  या राकेश शर्माच्या आयुष्यावर आधारित या बायोपिकमध्ये अवकाश वैज्ञानिकाची भूमिका साकारतोय.

न्यूटनचं गुपित

राजकुमार रावच्या न्यूटनची बॉलीवूडच्या विश्वात सध्या फारच चर्चा आहे. राजकुमारचं ते व्होटिंग मशीन आणि हेल्मेट घातलेलं पोस्टर सगळीकडे व्हायरल झालंय. या पोस्टरवरून तुम्हा प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणली गेलीय. त्यामुळेचं मसक्कलीने या पोस्टरचा अर्थ तुम्हाला समजवायचं ठरवलंय. नक्षलग्रस्त आदिवासी भागात व्होटिंग मशीन घेऊन फिरणारा कारकून म्हणजे न्यूटन. आता हा न्यूटन प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाने अधिराज्य गाजवतो का हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरचं समजेल. – मसक्कली