बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहे जे अभिनयाबरोबरच उत्तम नृत्यकौशल्यासाठीही ओळखले जातात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेता गोविंदा. गोविंदाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भुमिका केल्या असून त्याने काही चित्रपटांमध्ये विनोदी भुमिकाही निभावल्या आहेत. मात्र चित्रपटामध्ये गोविंदाच्या भूमिकांपेक्षा त्याची नृत्यशैली विशेष गाजली गेली. काही दिवसांपूर्वी त्याच्या याच नृत्यशैलीने आकर्षित होऊन ‘डान्सिंग काका’ यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती. ‘डान्सिंग काकां’नी एका लग्नसमारंभात गोविंदा स्टाईलने डान्स करुन प्रत्येक नेटक-याचं मन जिंकून घेतलं होतं. एवढंच नाही तर या ‘डान्सिंग काकां’नी गोविंदालाही आव्हान दिले होते आणि गोविंदानेही दिलेलं आव्हानही स्वीकारलं होतं.

गोविंदा सध्या पहलाज निहलानी दिग्दर्शित ‘रंगीला राजा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून हा चित्रपट बॅंकांना गंडा घालून फरार झालेल्या विजय माल्ल्याच्या जीवनावर आधारित असल्याचं सांगण्यात येत आहे. गोविंदाने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर त्याच्या वाट्याला अनेक यशस्वी चित्रपट आले. मात्र, यशस्वी चित्रपट मिळविण्यापूर्वी गोविंदाला आयुष्यात अनेक खाचखळग्यांना सामोरे जावे लागल्याचे त्याने एका कार्यक्रमामध्ये सांगितले.

‘जीवंत राहण्यासाठी जशी ऑक्सिजनची गरज असते त्याप्रमाणेच नृत्य माझं ऑक्सिजन आहे. माझं पहिलं प्रेमही नृत्यंच आहे. गाण्याचे बोल कानावर पडले की माझ्यात एक वेगळीच ऊर्जा संचारते आणि माझे पाय थिरकू लागतात. नृत्यावरील प्रेमाखातर मी कधीकाळी १९ किलोमीटर अंतर पायी कापत होतो’, असं गोविंदाने सांगितलं.
पुढे तो असंही म्हणाला, ‘नृत्यावर माझं असलेलं प्रेम मला स्वस्थ बसू देईन ना त्यामुळे मी डान्सचा क्लास लावला होता. मात्र क्लासला जाण्यासाठी मला १९ किलोमीटर अंतर कापावे लागत होते. माझं घर आणि क्लासमधलं अंतर प्रचंड होतं. त्यातच घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे क्लासला जाण्यासाठी बस किंवा अन्य वाहनाने प्रवास करणं माझं आर्थिक परिस्थितीच्या बाहेर होतं.त्यामुळे मी रोज १९ किलोमीटर चालत जात असे. मात्र डान्सप्रतीची माझी आवड, जिद्द आणि प्रेम पाहून माझे गुरु सरोज खान यांनी त्यावेळी मला मोफत प्रशिक्षण दिले होते’.

दरम्यान, गोविंदा आज जे काही आहे ते या डान्समुळेच आहे असं गोविंदा सतत म्हणत असतो. त्यामुळेच त्याने काही दिवसापूर्वीच धकधक गर्ल माधुरी दिक्षितच्या रिअॅलिटी शो ‘डान्स दिवाने’च्या सेटवर हजेरी लावली होती. यावेळी त्याने डान्सिंग काकांबरोबर डान्स करुन चाहत्यांची मने जिंकल्याचे पाहायला मिळाले.