दिलीप ठाकूर
देव आनंद कुठेही, म्हणजे चित्रपटाच्या सेटवर, पार्टीत, प्रिमियरला, मुलाखत देताना, त्याच्या चित्रपटाच्या अगदी प्रेस शोलाही (आवर्जून यायचा आणि आम्हा समिक्षकांना आपली ‘पुरानी पहचान’ असल्याच्या स्टाईलमध्ये भेटे) असा तो कुठेही असला तरी तो देव आनंदच असे आणि महत्वाचे म्हणजे तो कायमच तरुण असे. म्हणूनच तर त्याला हिप्पी संस्कृतीला छान फिल्मी मुलामा देणारा ‘हरे राम हरे कृष्णा’ (१९७१) हा चित्रपट निर्माण करण्याचे सुचले ना? त्या सुमारास केवढे वादळ उठले होते आणि तरुण पिढीला सावध केले जात होते. देवसाहेबांनी त्यासाठी चित्रपटाचे माध्यम वापरले.

‘प्रेम पुजारी’ (१९७०) या चित्रपटापासून देवसाहेब दिग्दर्शक झाले (पण का झाले असा खोचक प्रश्न कायमच विचारला गेला.) ‘हरे राम हरे कृष्णा’ हा त्यांचा दिग्दर्शनातील सर्वोत्कृष्ट चित्रपट होय. या चित्रपटात त्यांनी अनेक गोष्टी जुळवून आणल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे झीनत अमानला तिच्या बिन्धास्त म्हणूनच आकर्षक अशा व्यक्तीमत्वाला ‘दम मारो दम’ अशी प्रतिमा दिली आणि ती तिला कायमची चिकटली. खरं तर तिचा पहिला चित्रपट म्हणजे ओ. पी. रल्हन दिग्दर्शित ‘हलचल’, पण तिचे पहिले यश, ग्लॅमर आणि गॉसिप्स ‘हरे राम हरे कृष्णा’. पडद्यावर बेधडक चिरुट ओढणे, सतत अफूच्या अंमलाखाली असणे, बेफिकीर वृत्ती, तारुण्याचा कैफ हे तिने भारीच रंगवले. खरं तर या चित्रपटाची नायिका मुमताज पण नायकाच्या (अर्थात देव आनंद) लहानपणी हरवून मोठेपणी हिप्पी समूहात सामिल झालेली झीनत जास्त लोकप्रिय झाली.

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

या चित्रपटाचे लेखनही देव आनंदचेच. चित्रपटातील गीते आणि संगीत जबरदस्त सुपरहिट झाले, आनंद बक्षी यांची गीणी आणि राहुल देव बर्मनचे संगीत होते. आर. डी. कायमच तरुण संगीतासाठीच ओळखला गेला, त्याला तर हा चित्रपट म्हणजे मनसोक्त फटकेबाजीची चौफेर संधीच. ‘फुलों का तारों का सबका कहना है…’,  ‘देखो ओ दीवानो तुम ये काम ना करो…’, ‘ कांची रे कांची रे…’, ‘हरे रामा हरे कृष्णा…’ (हिंदी आणि इंग्रजी मिश्रित), ‘दम मारो दम मिट जाए गम…’ एकाच चित्रपटातील जवळपास सगळीच गाणी श्रवणीय (अर्थात थीमनुसार) असण्याचे ते दिवस होते. बिनाका गीतमालामध्ये ‘दम मारो दम’ कायमच सरताज गीत असे.

या चित्रपटात प्रेम चोप्रा, राजेन्द्रनाथ, ज्युनिअर मेहमूद, किशोर साहू, अचला सचदेव, इफ्तेखार, सुधीर, गौतम सरीन, इंद्राणी मुखर्जी इत्यादींच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचे आणखीन एक विशेष म्हणजे, कल्पना कार्तिक या चित्रपटाची कार्यकारी निर्मिती होती. आजच्या पिढीला कदाचित माहित नसेल, कल्पना कार्तिक म्हणजे, एकेकाळची नायिका आणि मग देव आनंदची पत्नी. दिग्दर्शक म्हणून देव आनंदचा प्रवास अगदी त्याच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत होता. त्यात सर्वात उल्लेखनीय ‘हरे राम हरे कृष्णा’च.