मराठीतील ‘हिरकणी’ आणि ‘ट्रिपल सीट’ हे दोन मोठे चित्रपट यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. परंतु ‘हाऊसफुल ४’ या हिंदी चित्रपटामुळे मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांचे दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांची गळचेपी होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या विरुद्ध हिरकणी चित्रपटाचा दिग्दर्शक प्रसाद ओक याने आवाज उठवला आहे.

महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना चित्रपटगृह न मिळाल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. दिवाळीत मराठीमध्ये हिरकणी आणि ‘ट्रिपल सीट’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याआधिच दोन्ही चित्रपटांसमोर स्क्रिन मिळविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. या विरोधात यापूर्वी अनेक मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांनी आवाज उठवला होता. पण त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा या घटनेमुळे आला आहे. हिरकणी आणि ट्रिपल सीट या चित्रपटांना थिअटर न मिळाल्याचा मुद्दा हिरकणीचा दिग्दर्शक प्रसाद ओक याने चर्चेत आणला आहे.

या विषयी बोलताना प्रसाद ओक म्हणाला “शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्याच महाराष्ट्रात छत्रपतींच्या इतिहासातील एका महत्वपूर्ण घटनेवर आधारित असलेल्या चित्रपटाला चित्रपटगृह मिळत नाही. यापेक्षा दुर्दैव ते काय असू शकते. दक्षिणेत प्राधान्य हे दाक्षिणात्य चित्रपटांना असतं, मग महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांची ही अवस्था का?” असा सवाल त्याने उपस्थित केला आहे.