पं. हृदयनाथ मंगेशकरांचे मनोगत
संतरचना आणि अन्य कवींच्या रचनांमध्ये खूप फरक असतो. संतरचना या कमालीच्या उत्कट व भावगर्भ असतात. त्यामुळे त्यांना चाल आपसूक लागते. त्या रचनाच संगीतकाराला चाल सुचवतात, असे अनुभवाचे बोल भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी नुकतेच व्यक्त केले. विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात झालेल्या ‘अमृताचा घनु’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्ञानेश्वरांच्या ‘मोगरा फुलला’ या रचनेला काय चाल लावावी याचा विचार मी करीत होतो, त्या रचनेचा कागद माझ्या हातात होता, त्या कागदातून जणू सूर ओघळले आणि मला चाल सुचली. त्या शब्दकळेतच ते सामथ्र्य होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. सोहम् प्रतिष्ठानचे विनीत गोरे व कौंतेय प्रतिष्ठानचे कौंतेय देशपांडे यांनी या पहाट मैफलीचे आयोजन केले होते.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या रचनांवर आधारित या कार्यक्रमाचे रसाळ व अभ्यासपूर्ण निरूपण विद्यावाचस्पती पं. शंकर अभ्यंकर यांनी केले. हृदयनाथांनी या वेळी ‘ओम नमोजी आद्या, पैल तोगे काऊ कोकताहे, दिन तैसी रजनी, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, घनु वाजे घुणघुणा’ आदी रचना सादर केल्या. अन्य संतांच्या तुलनेत ज्ञानेश्वरांच्या रचना या सैल आहेत, फारशा वृत्तबद्ध नाहीत, त्यामुळे त्यांना सुरावटीत गुंफणे ही आव्हानात्मक गोष्ट, तरीही हृदयनाथांनी त्या रचनांना प्रासादिक चाली लावल्या आहेत आणि लता मंगेशकरांच्या दिव्य स्वरांनी त्या रचनांवर कळस चढवला आहे, असे अभ्यंकर म्हणाले. हा धागा पकडत हृदयनाथांनी एक आठवण सांगितली. ओम नमोजी आद्या या रचनेला चाल लावून झाली होती. ध्वनिमुद्रणाचीही तयारी झाली, मात्र त्यात काहीतरी उणीव आहे, असे आम्हाला वाटत होते. त्या अस्वस्थततेच ध्वनिमुद्रण सुरू झाले, मात्र दीदी गायली आणि ती उणीव जणू नाहीशीच झाली, तिच्या परीसस्पर्शामुळे त्या रचनेला परिपूर्णता आली, असे त्यांनी सांगितले.
तीन तास चाललेल्या या कार्यक्रमास रसिकांची तुडुंब उपस्थिती होती. या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, आमदार पराग अळवणी व नगरसेविका ज्योती अळवणी आदी उपस्थित होते.

book review the beast you are stories by paul tremblay
बुकमार्क : आजच्या काळातील भयकथा
Famous Odissi Dancer Jhelum Paranjape article on International Dance Day
नृत्याविष्कार!
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
book review cctvnchya gard chayet by geetesh gajanan shinde
आत्मशोधाच्या पदपथावरील कविता