स्टार कलावंत हा प्रमुख कणा असलेला हिंदी सिनेमा आजच्या घडीलाही बदललेला नाही. खासकरून सलमान, शाहरूख आणि आमिर खान या नव्वदच्या दशकात रुपेरी पडद्यावर सर्वाधिक गाजलेल्या खानांचे चित्रपट, त्यांच्या चित्रपटांची पंचविशी, तसेच त्यांचे त्यांच्या नायिकांबरोबर गाजलेली गाणी, त्याचे चित्रीकरण याचा पगडा चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आणि प्रेक्षकांच्या मनावरही राहतो असे दिसते. म्हणूनच की काय, राजश्री प्रॉडक्शन्सच्या आगामी ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात सलमान खानच्या गाजलेल्या गाण्यातील एक दृश्य नव्याने चित्रित करण्यात आले असावे.
सलमान-ऐश्वर्या राय यांच्या प्रेमाची चर्चा प्रचंड रंगली असतानाच्या काळातच त्यांचा ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. संजय लीला भन्साळी यांच्या या चित्रपटातील गाणी खूप गाजली होती. त्यातील ‘आँखो की गुस्ताखीयाँ’ या गाण्यात राजस्थानी पारंपरिक पोशाखात ऐश्वर्या-सलमानचे चित्रीकरण करण्यात आले होते. या गाण्याचे चित्रीकरणही लोकांना आवडले होते. यात सलमान- ऐश्वर्याची लांबलचक वेणी ओढतो असे एक दृश्य होते. आता हेच दृश्य राजस्थानी पोशाखातच ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात दिसणार आहे. अर्थात सलमानसोबत ऐश्वर्या नव्हे तर सोनम कपूर पडद्यावर दिसणार आहे.
सलमान खान-ऐश्वर्या राय यांच्यात १९९८-९९ दरम्यानच्या काळात प्रेमसंबंध रंगले होते. त्यावरून नंतर वादंगही झाला होता. या सगळ्या गोष्टींची पाश्र्वभूमी असल्यामुळे की काय ‘हम दिल दे चुके सनम’मध्येही त्या गाण्यादरम्यानचे ते दृश्य प्रचंड गाजले होते. आता पुन्हा त्याच पद्धतीचे दृश्य आजच्या आघाडीच्या अभिनेत्रीसोबत चित्रित करण्यात आले आहे. हिंदी सिनेमावाले गल्लापेटीवरचे आपले लक्ष कधीही विचलित होऊ देत नाहीत, हेच यावरून स्पष्ट होते. स्टार कलावंतांना घेऊन केलेला सिनेमा सतत चर्चेत, वादात ठेवून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे यात हिंदी सिनेमावाले माहीर आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज पडू नये. या गाण्यातील ‘त्या’ गाजलेल्या ‘दृश्या’ची नवीन आवृत्ती तयार करून सिनेमा बनविण्यामागेही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिलेल्या गोष्टींना उजाळा देण्याचा प्रकार दिसतो.
अर्थात ‘हम दिल दे चुके सनम’च्या वेळी सलमान-ऐश्वर्या यांचे संबंध गाजले होते आणि आता मात्र सलमान त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या सोनम कपूरसोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे हा मूलभूत फरक मात्र कायम राहील, त्यामुळे पूर्वीइतके गाजलेले दृश्य आता पुन्हा प्रेक्षकांना पाहायला आवडेल का, हा खरा प्रश्न आहे.