शाहिद कपूर स्टारर ‘कबीर सिंग’ हा चित्रपट २१ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक असलेला हा चित्रपट देशासह विदेशातही गाजत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय केल्यामुळे शाहिदचीही लोकप्रियता आता कमालीची वाढली आहे. ‘कबीर सिंग’ने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर २३५. ७२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने ‘भारत’ आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटांनाही कमाईमध्ये मागे टाकलं आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर आकडेवारी जाहीर करत ही माहिती दिली आहे.

‘कबीर सिंग’पूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये सलमान खानचा ‘भारत’ आणि विकी कौशलचा ‘उरी’ आणि रणवीर सिंहचा ‘गली बॉय’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांनी ऑस्ट्रेलियामध्ये अनुक्रमे ‘गली बॉय’ ९,४४,९७४ डॉलर ( ४५ कोटी रुपये), ‘उरी’ ८,८७,९२१ डॉलर (४२ कोटी रुपये), ‘भारत’ ८,५२,५०६ डॉलर (४० कोटी रुपये), ‘कलंक’ ८,३४,०३७ डॉलर (४० कोटी रुपये)इतकी कमाई केली होती. विशेष म्हणजे या साऱ्या चित्रपटांना मागे टाकत ‘कबीर सिंग’ने ऑस्ट्रेलियामध्ये ९.५९,९९४ डॉलरची (४६ कोटी रुपये) कमाई केली आहे.

दरम्यान, भारतामध्ये या चित्रपटाने केवळ तीन आठवड्यांमध्ये २३५ कोटींचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने २०१९ या वर्षातील अनेक सुपरहिट चित्रपटांना कमाईमध्ये मागे टाकलं आहे.