जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये गुरूवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले आहेत. या भ्याड हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयांचा संताप अनावर झाला आहे. क्रीडा क्षेत्रापासून ते बॉलिवूडपर्यंत सर्वजण या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आहेत. दहशतवाद्याच्या या भ्याड हल्ल्याचा बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने कठोर शब्दात संताप व्यक्त केला आहे. तसेच या हल्ल्यानंतर शांततेत मार्ग काढा असे म्हणणाऱ्याचा कंगनाने चांगलाच समाचार घेतला आहे. आता जो शांततेबद्दल बोलेल त्याला रस्त्यावर आडवून कानाखाली मारा असे वक्तव्य कंगनाने केले आहे. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत कंगना संताप व्यक्त केला.

माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांनी शुक्रवारी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी हिंसा नव्हे तर संवाद हवा, असं वक्तव्य केलं होतं. यावर कंगनाने नाव न घेता निशाणा साधला. ती म्हणाली, जवानांवर हल्ला केला जात आहे आणि काही लोक अहिंसा आणि शांतीच्या गोष्टी करत आहेत. असं म्हणणाऱ्यांच्या तोंडाला काळं फासून त्यांची गाढवावरुन धिंड काढली पाहिजे.

(आणखी वाचा : पाकिस्तानशी चर्चा करा म्हणणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्याविरोधात संताप)

‘पाकिस्तानने फक्त आपल्या सुरक्षा व्यवस्थेवर हल्ला केला नाही, तर आपल्याला उघडपणे आव्हान दिले आहे. आत्मसन्मानला ठसा पोहचवून आपला अपमान केला आहे. अशामध्ये आपल्याला आता ठोस पावले उचलून निर्णय घेण्याची गरज आहे. आपल्या शांततेचा हे आणखी फायदा घेतील, असे कंगना म्हणाली. ‘

‘४० जवानांच्या मत्यूमुळे आज प्रत्येक भारतीय दुखी आहे. प्रत्येकाच्या मनात खेद आहे. अशा परिस्थितीत जो शांतता आणि अहिंसाबद्दल बोलेल, त्याला भररस्त्यात कानाखाली मारले पाहिजे. जो शांततेबद्दल बोलेल त्याचे तोंड काळे करून गाढवावर धिंड काढली पाहिजे, अशा कठोर शब्दाद कंगनाने शांततेबद्दल बोलणाऱ्याला खडसावले आहे.’

(आणखी वाचा : सिद्धूसोबत काम करणं बंद कर , पुलवामा हल्ल्यानंतर संतापलेल्या नेटकऱ्यांच्या कपिलला इशारा )

जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांच्या पाकिस्तान जाण्याबद्दल कंगनाला विचारले. त्यावर त्या ते देशद्रोही आहेत, असं वक्तव्य कंगना रनौत हिने केलं आहे. ती म्हणाली, जावेद अख्तर आणि शबाना आझमी पाकिस्तानशी संस्कृतीचं अदान-प्रदान करतात. हे तेच लोक आहेत जे ‘भारत तेरे तुकडे होंगे’ म्हणणाऱ्यांचं समर्थन करतात. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती. तरी शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांना पाकिस्तानमध्ये कार्यक्रम घेण्याची गरज का वाटली? असा सवाल कंगनाने उपस्थित केला आहे.

कंगानं ‘मणिकर्णिका’चं यश साजर करण्यासाठी चित्रपटाच्या संपूर्णटीम आणि बॉलिवूडसाठी पार्टीचं आयोजन केलं होतं. १६ फेब्रुवारीला ही पार्टी होणार होती. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर कंगनानं ही पार्टी रद्द केली आहे. यश नंतर साजरं करू असं कंगनानं म्हटलं आहे. तसेच या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना कंगनानं श्रद्धांजली देखील वाहिली आहे.

( आणखी वाचा : Pulwama Terror attack: भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे बॉलिवूडमध्येही संतापाची लाट)

तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४०  जवान शहीद झाले असून २० जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्याने देशभर संतापाची लाट उसळली असून या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा गर्भित इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.