एकीकडे भन्साळींच्या ‘पद्मावत’ चित्रपटाच्या वादाच्या चर्चा थांबत नाहीत तोच दुसरीकडे बॉलिवूडमधील आणखी एका चित्रपटाच्या वाटेत अडचणी निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. अभिनेत्री कंगना रणौतची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटाला राजस्थानमध्ये ब्राह्मण महासभेकडून विरोध करण्यात येत होता. पण, आता मात्र या चित्रपटाच्या वाटेतील सर्व अडथळे दूर झाले आहेत.

चित्रपट निर्मात्यांशी चर्चा झाल्यानंतर आता ब्राह्मण महासभेने या चित्रपटाला विरोध न करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. या चित्रपटातून राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी कोणतीच चुकीची माहिती दाखवण्यात येणार नसल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. त्यासोबतच राणी आणि इंग्रज अधिकारी यांच्यात कोणत्याच प्रकारचे प्रेमगीतही दाखवण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सुरुवातीलाच काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्यामुळे आता ‘मणिकर्णिका’ची वाट मोकळी झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. मुख्य म्हणजे आता पुन्हा एकदा राजस्थामध्ये चित्रपटाच्या उर्वरित भागाचे चित्रीकरण करता येणे शक्य होणार आहे.

वाचा : Padman Movie Review : सुरुवातीला भरकटणारा, पण क्षणार्धात सूर पकडणारा ‘पॅडमॅन’

राणी लक्ष्मीबाई आणि इंग्रज अधिकारी यांच्यातील प्रेमसंबंधांचे चित्रण असणारे गाणे या चित्रपटात असल्याचा मुद्दा उचलून धरत ब्राह्मण महासभेचे संस्थापक सुरेश मिश्रा यांनी चित्रपटाला विरोध केला होता. पण, आता खुद्द निर्मात्यांनीच काही गोष्टी स्पष्ट केल्यामुळे अखेर ‘क्वीन’ कंगनाच्या आगामी चित्रपटाच्या वाटेतील अडथळा दूर झाला आहे.