कॉमेडी किंग कपिल शर्माच्या वादांची मालिका काही थांबताना दिसत नाही. ट्विटरवरुन प्रसारमाध्यमांना केलेली शिवीगाळ ताजी असतानाच त्याने आपले माजी व्यवस्थापक निती, प्रीती आणि एका पत्रकारावर पैसे घेऊन आपली बदनामी करण्याचे आरोप करत गुन्हा दाखल केला. या तिघांमुळे आपल्याला मानसिक त्रास झाल्याचं कपिलनं तक्रारीत म्हटलं आहे. त्याचप्रमाणे ट्विटरवर आपणच शिवीगाळ केल्याची कबुलीसुद्धा त्याने दिली आहे. सुरुवातीला ते ट्विट्स आपण केले नसून अकाऊंट हॅक झाल्याचं त्याने म्हटलं होतं.

कपिलने दाखल केलेल्या तक्रारीची कॉपी ट्विटरवर पोस्ट करत म्हटलं की, ‘फक्त काही पैशांसाठी काही लोक तुमची बदनामी करतात. चुकीच्या गोष्टींविरोधात उभं राहण्यात कित्येक वर्षं निघून जातात. पण आज मी हे करणार आहे.’ काही काळ ब्रेक घेतल्यानंतर ‘फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा’ या नव्या शोच्या माध्यमातून त्याने कमबॅक केलं. मात्र आठवड्याभरातच हा नवीन शोसुद्धा बंद पडणार असल्याच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर कपिलने ही तक्रार दाखल केली आहे.

वाचा : काळवीट शिकारीसाठी ‘त्या’ दोघींनी सलमानला प्रवृत्त केलं; प्रत्यक्षदर्शीचा दावा

या तक्रारीत कपिलने त्याच्या दोन माजी व्यवस्थापकांचा उल्लेख केला आहे. नीती सिमोईस आणि प्रिती सिमोईस या दोघी २०१६-१७ मध्ये कपिलची सर्व महत्त्वाची कामं पाहायच्या. मात्र, प्रसारमाध्यमांसमोर कपिलची प्रतिमा नीट सादर न केल्याप्रकरणी, वेळेवर काम न केल्याप्रकरणी त्यांना नोकरीवरून काढून टाकल्याचं त्याने यात स्पष्ट केलं आहे.

वाचा : सलमानला साथ देणं पाकिस्तानी अभिनेत्रीला पडलं महागात 

६ महिन्यांपूर्वी कपिलच्या जवळच्या मित्राला कोणीतरी संपर्क साधून प्रसारमाध्यमांमध्ये कपिलची वाईट प्रतिमा सुधारून देण्यासाठी एका मीडिया वेबसाइटने २५ लाख रुपये मागितले होते. पैसे देण्यास कपिलने नकार दिल्याने त्या वेबसाइटवर कपिलविरोधात मजकूर येऊ लागला. त्यामुळेच आपलं मानसिक आरोग्य बिघडलं, असंही कपिलनं या तक्रारीत म्हटलं आहे. नीती आणि प्रितीला कपिलच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी ठाऊक होत्या आणि त्याच गोष्टी अवाजवी करून त्या वेबसाइटवर नकारात्मक पद्धतीने मांडण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे. या दोघींसोबतच वेबसाइटच्या पत्रकाराविरोधात कपिलने पोलिसांकडे तक्रार केली आहे.