अपयशी झालेला टीव्ही शो, सहकलाकारांनी फिरवलेली पाठ, पूर्वाश्रमीच्या प्रेयसीसोबत झालेले वाद या सगळ्या कारणानं अस्वस्थ झालेला कपिल गेल्या दोन महिन्यांपासून प्रकाशझोतात नाही. सोशल मीडियापासूनही त्यानं फारकत घेतली आहे. पत्रकारांना शिवीगाळ केल्यानंतर कपिलनं सोशल मीडियापासून चार हात लांब राहणंच पसंत केलं होतं. गेल्या आठवड्यात त्यानं दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांशी संवाद साधला होता.

खरं तर कपिलला पाहण्याची इच्छा त्याच्या चाहत्यांना आहे मात्र कपिल सगळ्यापासून लांब राहत आहे. अखेर बऱ्याच दिवसांनंतर कपिल समोर आला आहे आणि कपिलची ही अवस्था पाहून अनेकांना जबरदस्त धक्का बसला आहे. कारण एरव्ही ‘फिट अँड फाईन’ असणारा कपिल मात्र आता स्थूलपणाचा शिकार झाला आहे. डोळ्याखाली काळी वर्तुळं, वाढलेलं वजन हे कपिलच्या तब्येतीबद्दल बरंच काही सांगून जात होतं. गेल्या काही दिवसांपासून कपिल नैराश्येत असल्याची माहितीही त्याच्या काही जवळच्या मित्रांनी दिली होती. अखेर कपिलला या अवस्थेत पाहिल्यावर काही दिवसांपासून तो आयुष्यातील कठीण काळातून जात असल्याचं स्पष्ट दिसत होतं.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कपिलनं चाहत्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी मी पहिल्यासारखा फिट अँड फाइन होत नाही तोपर्यंत समोर येणार नाही असं म्हटलं होतं. तसेच आपण काही गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनं म्हटलं होतं. आता कपिलचे हे फोटो त्याच्याबद्दल बरंच काही चाहत्यांना सांगून गेले. एरव्ही प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कपिलचं हसू मात्र कुठच्या कुठे गेलं आहे. त्यामुळे कपिलनं लवकरात लवकर यासगळ्यातून बाहेर पडावं अशी प्रार्थना त्याच्या चाहत्यांनी केली आहे.