‘कोण होणार करोडपती’ हा शो ‘सोनी मराठी’ वाहिनीवर २७ मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ‘उत्तर शोधलं की जगणं बदलतं’ या संकल्पनेसह यावेळी ‘कर्मवीर’ हा उपक्रम आणि ‘गुंतवणूक सल्लागार’ या दोन विशेष गोष्टीही असणार आहेत. याबद्दल आणि एकूणच ‘सोनी मराठी’ वाहिनीच्या पुढील वाटचालीविषयी बोलताना वाहिनीचे व्यवसायप्रमुख अजय भालवणकर यांनी वाहिनीच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याने येत्या काही दिवसांत आणखी दर्जेदार आशय वाहिनीवरून पाहायला मिळणार असल्याचे सांगितले.

‘कौन बनेगा करोडपती’ हा शो त्याचे स्वरूप आणि अमिताभ बच्चन यांच्यामुळे हिंदीत तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो आहे. पण त्याला मराठमोळा करण्यासाठी आणि मराठी प्रेक्षकांसाठी काही खास आश्चर्याचा धक्का वगैरे ‘कोण होणार करोडपती’मध्ये असणार का, यावर अजय भालवणकर म्हणाले, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नागराज मंजुळे करणार हे सरप्राइज सर्वप्रथम ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून प्रेक्षकांना कळलं. तर हाच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा सुखद धक्का होता. त्याचबरोबर या शोमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही वेगळेपण या शोमध्ये घेऊ न येणार आहे. नागराज मंजुळेही सूत्रसंचालनातून नवनवीन गोष्टी घेऊ न प्रेक्षकांसमोर येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. हा शो जगभरात खेळला गेलेला आहे. त्याचा स्वत:चा असा एक प्रभावी फॉम्र्यूला आहे. त्याची विशिष्ट मांडणी आहे. जागतिक स्तरावर स्वीकारला गेलेला हा शैलीदार आखीव-रेखीव कार्यक्रम आहे. ज्यात १५ प्रश्न असतात. या शोचे काही मापदंड आहेत, त्यातूनही या शोचे वेगळेपण दिसते. सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी गोष्ट यामध्ये उलगडणार आहे. काही गोष्टी अशा आल्यात की त्या ऐकताना-पाहताना टचकन डोळ्यांत पाणी येतं. यामध्ये सहभाग घेण्यासाठी लाखो लोकांचे अर्ज आले, अशी माहिती भालवणकर यांनी दिली.

सचोटीने बनवलेले प्रश्न त्याचबरोबर ५०-५० (फिफ्टी-फिफ्टी), तज्ज्ञांचा सल्ला (एक्सपर्ट अ‍ॅडव्हाइस) आणि  प्रेक्षकांचे मत (ऑडियन्स पोल) अशा तीन लाइफलाइन हिंदीप्रमाणे या कार्यक्रमातही असणार आहेत. ३ लाख २० हजार रक्कम जिंकल्यावर गुंतवणूक सल्ला देण्यासाठी गुंतवणूक सल्लागारही मदतीला असणार आहे. त्याचबरोबर समाजामध्ये आपल्या कर्तृत्वाने सकारात्मक बदल घडवलेल्या व्यक्तिमत्त्वांना कर्मवीर या विशेष भागात बोलावले जाणार आहे, असेही भालवणकर म्हणाले.

सोनी समूह हा रिअ‍ॅलिटी शोज आणि कार्यक्रमाच्या वेगळ्या संकल्पनांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पुढे जाताना त्यांचा भर रिअ‍ॅलिटी शोज किंवा कथाबाह्य़ कार्यक्रमांकडेच असणार का, यावर बोलताना ‘सोनी मराठी’च्या पुढच्या वाटचालीत आम्ही लवकरच अजून काही वेगळे कार्यक्रम घेऊ न येणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. त्यामध्ये जिजामाता यांचा चरित्रपट उलगडणारी मालिका करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. ‘कोण होणार करोडपती’च्या निमित्ताने एक वेगळा प्रेक्षकवर्ग वाहिनीकडे येईल, त्या प्रेक्षकवर्गाला टिकवून ठेवण्यासाठी इतरही कार्यक्रम त्यानंतर आखलेले आहेत, असे ते म्हणाले.

‘कोण होणार करोडपती’ हा आमच्यासाठी महत्त्वाचा कार्यक्रम आहे. मनोरंजन, ज्ञानवर्धन, त्याचबरोबर लोकांना यात सहभागी होण्याची थेट संधी या तिन्ही गोष्टी यातून साध्य होणार आहेत. त्यामुळे सध्या या कार्यक्रमाक डून खूप अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.