सध्या बॉलिवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खान त्याचा आगामी चित्रपट ‘लाल कप्तान’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात सैफ अली खान नागा साधूंच्या रुपात दिसणार आहे. सैफचा चित्रपटातील अनेखा लूक पाहून चाहत्यांची चित्रपटाबाबती उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहता कपाळी कुंकवाचा टीळा, काजळ लावलेले डोळे असा नागा साधूंचा लुक असलेला सैफ अतिशय रागिट स्वभावाचा दिसत आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीला सैफ अली खानचा आवज ऐकू येतो. सैफ घोड्यावर बसून एका व्यक्तीचा मृतदेह संपूर्ण गावभर फिरवताना दिसत आहे. ‘आदमी के पैदा होते ही काल भैंसे पर बैठकर चल पड़ता है उसे वापस लाने के लिए. आदमी की जिंदगी उतनी, जितना समय उस भैंसे को लगा उस तक पहुंचने में’ असा थरकाप उडवणारा डायलॉग सैफ बोलत आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा देखील आवाज ऐकू येतो. ‘भोले के सिपाही नही भूत होते है’ असे सोनाक्षी म्हणत आहे. सैफचा चित्रपटातील हा लूक आणि अभिनय चाहत्यांच्या पसंतीला उतरला आहे. चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर तुफआन व्हायरल झाला आहे.

लाल कप्तान हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख ११ ऑक्टोबर ठरवण्यात आली होती. मात्र चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला. सैफ अली खान चित्रपटात नागा साधूंच्या भूमिकेत दिसणार असून सोनाक्षी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन नवदीप सिंग करत आहेत. तसेच या चित्रपटाची संपूर्ण कथा नागा साधू यांच्या जीवना भोवती फिरताना पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील सैफची भूमिका ही त्याच्या आता पर्यंतच्या करिअरमधील आव्हानात्मक भूमिका असणार आहे. त्यामुळे चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. ‘सैफ हा खूप चांगला कलाकार आहे आणि या चित्रपटातील भूमिकेतून सैफच्या अभिनयातील एक नवा पैलू पाहायला मिळणार आहे’ असे चित्रपट निर्माते सुनिल लुल्ला यांनी सांगितले आहे.