‘लग्नाची गोष्ट’ ही सध्या नाटक, चित्रपट आणि सीरियल्समधलं चलनी नाणं झालेलं आहे. लग्न व विवाहसंस्थेवर मल्लिनाथी करणाऱ्या किंवा त्यातील कटु-गोड घटनांचं खुसखुशीत दर्शन घडविणाऱ्या कलाकृतींना प्रेक्षक/ दर्शकांचा चांगला प्रतिसाद मिळतो, हे वास्तव आहे. आणि आपली ‘कला’ उत्तम rv09वेष्टनात सादर करून बाजारात विकणाऱ्यांनी हे बरोब्बर हेरलेलं असल्याने लग्नाचा हा कलात्मक बाजार सध्या जोमात आहे. सुनील हरिश्चंद्रलिखित आणि सुदेश म्हशीलकर दिग्दर्शित ‘लग्नलॉजी’ हे नाटकही याच पठडीतलं आणि लेबल बदलून पुनश्च रंगभूमीवर आलेलं आहे. लग्नापूर्वी एकमेकांवाचून जराही न करमणारी जोडपी लग्नानंतर मात्र हळूहळू एकमेकांना कंटाळतात, त्यांच्यात कुरबुरी सुरू होतात. त्यांचं रूपांतर नस्ते समज-गैरसमजांमध्ये होऊ लागतं. त्यातून भांडणाला तोंड फुटतं. आणि मग त्यांच्यामधलं नाजूक नातं सडत जाण्याची प्रक्रिया सुरू होते.. हा या समस्त ‘लग्न-विशेष’ कलाकृतींचा विषय तसा सार्वकालिकच म्हणावा लागेल.
‘लग्नलॉजी’मध्येही सुहास आणि सुनिधी या जोडप्यामध्ये अशाच समज, गैरसमज व अपसमजांच्या अलांघ्य भिंती उभ्या राहतात आणि त्यांच्यातलं नातं हळूहळू विरायला लागतं. त्याला हळूहळू दरुगधी यायला सुरुवात होते. यात नेमका दोष कुणाचा, हे तसं महत्त्वाचं नसतंच. कारण म्हटलं तर त्यांच्यापैकी कुणीतरी एक ठिणगी पडायला कारण झालेला असतो. किंवा काही वेळा तसंही होत नाही. दोषी असते परिस्थिती आणि त्या विवक्षित घटनेकडे पाहण्याचा त्या नवरा-बायकोचा त्यावेळचा दृष्टिकोन. ‘लग्नलॉजी’चं एक वैशिष्टय़ म्हणजे यात कुणा एकालाच अपराधी न ठरवता स्त्री-पुरुषांच्या मेंदूच्या कार्यशैलीतील वेगळेपणामुळे हे घडतं असं दाखवलं आहे. सबब समस्त नवरेबुवांना नवरा-बायकोतील भांडणांत आता स्वत:ची दोषारोपांतून सुटका करून घेण्यास एक सबळ शास्त्रीय कारण सापडलं आहे. कारण कोणतंही काम करताना पुरुषाचा फक्त उजवा मेंदूच तेवढा कार्यरत असल्यानं त्याला एका वेळी फक्त एकच गोष्ट नीटपणे करायला जमते. तथापि स्त्रीचा उजवा आणि डावा असे दोन्ही मेंदू एकाच वेळी सक्रीय असल्याने तिला एकाच वेळी अनेक आघाडय़ांवर लढणे शक्य होते. एका वेळी अनेक कामं तिला अत्यंत सफाईनं करता येतात. ही बाब आता शास्त्रीयदृष्टय़ा सिद्ध झाली आहे. त्यामुळे नवरे जमातीच्या वेंधळेपणाला ते स्वत: जबाबदार नसून त्यांच्या मेंदूच्या अकार्यक्षमतेमुळे तसं घडतं, हे शास्त्रानंच शोधून काढलेलं रहस्य आहे. त्यामुळे याउप्पर नवरे मंडळींना त्यांच्या अकार्यक्षमतेबद्दल बायकोनं दोष देण्याचं वा नावं ठेवण्याचं काहीएक कारण नाही. तेव्हा समग्र नवरे मंडळींनी ‘लग्नलॉजी’ हे नाटक आवर्जून आपापल्या बायकोला दाखवायला हरकत नसावी. बायकोच्या मते ‘गुन्हा’ असलेल्या कुठल्याही गुन्ह्य़ात अटकपूर्व जामीन मिळण्याची सोय यामुळे पुरुषांना उपलब्ध झालेली आहे. असो.
नाटकातील सुहास आणि सुनिधी यांच्यातील छोटय़ा-मोठय़ा भांडणांना बहुतेक वेळा सुनिधीच कारणीभूत असल्याचं सकृद्दर्शनी जरी दिसत असलं तरीही सुहासनेच पडतं घेऊन तिचं ऐकावं; जेणेकरून त्यांचं लग्न टिकण्यास मदत होईल असा सल्ला त्याचा मित्र कम् सायकिअ‍ॅट्रिस्ट कम् या नाटकाचा सूत्रधार ‘लग्नलॉजी’मध्ये देतो. आणि हा सल्ला रास्तच आहे. लग्न ‘यशस्वी’ करायचं असेल तर नवऱ्यानं बायकोच्या प्रत्येक म्हणण्याला कायम होकार भरणं, हाच एकमेव मार्ग होय. इतिहासातल्या आणि वर्तमानातल्याही भल्या भल्या मंडळींनी आपले हे अनुभवाचे बोल नमूद करून ठेवलेले आहेत. आणि अगदीच कसली मात्रा लागू पडली नाही, तर बाळाचं आगमन हा नवरा-बायकोच्या संसारातील भांडणं मिटवण्याचा हमखास रामबाण उपाय होय. सुहास-सुनिधीच्या भांडणांत तोच अखेरीस लागू पडतो.
लेखक सुनील हरिश्चंद्र यांनी नवरा-बायकोच्या नात्यावरील हे हलकंफुलकं नाटक छान रचलंय. परंतु यातले सुहास-सुनिधी यांच्यातले भांडणांचे प्रसंग फारच लुटूपुटूचे योजल्यामुळे त्यांत म्हणावी तशी गंमत येत नाही. क्वचित कधीतरी आता बॉम्ब फुटणार असं वाटत असतानाच तोही चक्क आपटीबार निघतो. त्यामुळे नाटकातील संघर्ष टोकाला जातच नाही. परिणामी ठाय लयीतलं एखादं गाणं आपण ऐकतो आहोत की काय अशी भावना होते. फिरून फिरून त्याच समेवर येणारं हे गाणं हळूहळू कंटाळवाणं वाटू लागतं. खरं तर सुहास-सुनिधी यांच्यातली भांडणं ही त्यांच्या स्वभावभिन्नतेमुळे होत असतात. त्यावर त्यांनी आपले दृष्टिकोन बदलणं हाच मार्ग असू शकतो. परंतु तसं न दाखवता त्यांच्यातल्या भांडणांना दोन मेंदूची फोडणी लेखकानं दिली आहे. ती या नाटकात चपखल बसत नाही. बादरायण संबंध जोडल्यासारखी ती वाटते. खरं तर या कल्पनेभोवतीच सबंध नाटक रचलं गेलं असतं तर एक छान वेगळी गंमत आली असती. दिग्दर्शक सुदेश म्हशीलकर यांनीही ही गोष्ट लेखकाच्या ध्यानी आणून दिलेली नाही. सबब ही कल्पना अधांतरीच लटकत  राहते. नाटकातल्या सूत्रधार या पात्राचं प्रयोजन काय, हेही कळायला मार्ग नाही. शेवटाकडे सायकिअ‍ॅट्रिस्ट हे पात्र आलं असतं तरी काम भागलं असतं. बरं, हा सायकिअ‍ॅट्रिस्टही जगावेगळं काही सांगत नाही. ‘बायकोचं ऐक’ एवढंच सांगतो. त्यासाठी सोम्यागोम्या कुणीही चालला असता. असो. दिग्दर्शकानं उपलब्ध संहितेतच नाटकात अधिक जान ओतण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुहास दारू प्यायल्यानंतरच्या प्रसंगाचं उदाहरण याकरता देता येईल. हा प्रसंग अनावश्यकरीत्या लांबवला आहे खरा; पण त्याला थोडी कात्री लावली असती तर त्यातली गंमत अधिक खुलली असती. सुहास आणि सुनिधी यांच्यातले तणावपूर्ण प्रसंग काहीसे सैलसरच बांधल्याचं जाणवतं. ते अधिक घट्ट विणीचे व्हायला हवे होते. एका प्रसंगातला संघर्ष पुढच्या प्रसंगापर्यंत रेंगाळत राहायला हवा होता. पण तसं नाटकात होत नाही. अशानं नाटकाचा टेम्पो चढत नाही. आणि पुनश्च नव्यानं संघर्षांला धार चढवायची पाळी येते. नाटकात चढत्या भाजणीनं संघर्षांनं टोक गाठायला हवं, तरच त्याची परिणामकारकता जाणवते. अन्यथा ठाय लयीतलं गाणंच नशिबी येतं. असो.
अवधुत गुप्ते यांचं शीर्षकगीत छान आहे. सचिन गोताड यांनी सुहास-सुनिधीचं उच्च मध्यमवर्गीय घर नेमकेपणानं साकारलं आहे. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेतून संघर्षांची धार तीव्र करण्याचा प्रयत्न केला आहे. सिद्धेश दळवी यांची नृत्यं मात्र बेजान वाटतात. प्रकाश निमकर यांची वेशभूषा व राजेश परब यांची रंगभूषा आल्हाददायी आहे. राहुल रानडे यांचं पाश्र्वसंगीत मूड्सना उठाव देतं.   
संतोष जुवेकर यांनी सुहासची गोची मस्त दाखवली आहे. विशेषत: दारू प्यायल्यानंतरची त्यांची बडबड धमालच. तिची अनावश्यक लांबी थोडी कमी केली तर तो ‘वन मॅन शो’ वाटणार नाही. समस्त नवऱ्यांची गोची त्यांनी मुखर केली आहे. अभिज्ञा भावे यांची सुनिधी म्हणजे टिपिकल बायकोचा वानवळा आहे. नवऱ्याचं काहीएक ऐकू न घेता आपलंच तेवढं घोडं पुढं दामटत आणि वर त्याच्यावरच प्रत्येक गोष्टीचं खापर फोडण्याची तिची सवय खरं तर त्यांच्यामधल्या बेबनावाला कारणीभूत होते. परंतु नाटककारानंही तिचंच बरोबर आहे असं दाखवून नवरे मंडळींवर अन्याय केला आहे. सायकिअ‍ॅट्रिस्टनं सुनिधीलाही तिची चूक समजावून सांगितली असती तर नाटकाचा तोल सांभाळला गेला असता. असो. म्हणतात ना, आले लेखकाच्या मना..! अभिज्ञा भावे यांनी अस्सल बायको मटेरिअल सच्चेपणानं उभं केलं आहे. त्यात उणीव काढायला त्यांनी जागाच ठेवलेली नाही. सुदेश म्हशीलकर यांनी नाटकाचा सूत्रधार कम् सुहासचा मित्र कम् सायकिअ‍ॅट्रिस्ट लक्षवेधी केला आहे. त्यांचा प्रसन्न वावर सुखावणारा आहे.
एकुणात, ही ‘लग्नलॉजी’ प्रत्येकानं आपापल्या सोयीनं समजावून घ्यायला हरकत नाही.

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Pune, School boy beaten,
पुणे : नदीपात्रात शाळकरी मुलाला मारहाण; विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित