राजकुमार हिराणी यांचा ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आहे. हा चित्रपट २५ डिसेंबर २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच छाप उमवटवी होती. मात्र आता पुन्हा एकदा हा चित्रपट महाराष्ट्र ट्राफिक पोलिसांनी केलेल्या ट्विटमुळे चर्चेत आहे. या ट्विटमध्ये पोलिसांनी अभिनेता आमिर खान, शरमन जोशी आणि आर माधवन यांचा चित्रपटातील फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये आर माधवन गाडी चालवताना दिसत आहे.

महाराष्ट्र ट्राफिक पोलिसांनी तिघांचा ट्रिपल सीट फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ट्रिपल सीट गाडी चालवू नका आणि विना हेल्मेट गाडी चालवल्यास जाऊ देणार नाही म्हणजेच दंड आकाराला जाईल असे म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये ‘दिल जो तेरा बात-बात पर घबराए, ड्राइवर इडियट है, प्यार से उसको समझा लें’ असे कॅप्शन दिले आहे. तसेच ट्विटमध्ये हॅशटॅग वापरुन रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान असे म्हटले आहे. त्यांनी हे ट्विट आर माधवनला टॅग देखील केले आहे.

आता त्यांच्या या ट्विटवर आर माधवनने उत्तर दिले आहे. त्याने हेल्मेट घालून गाडी चावलतानाचा फोटो शेअर केला आहे. ‘मी तुमच्या बोलण्याशी पूर्णपणे सहमत आहे’ असे त्याने म्हटले आहे. माधवनच्या या ट्विटवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. काही चाहत्यांनी माधवनची प्रशंसा केली आहे. तर काहींनी त्याला हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला आहे.

‘3 इडियट्स’ या चित्रपटात आमिर खान, आर माधवन, करीना कपूर, शरमन जोशी मुख्य भूमिकेत होते. तसेच चित्रपटातील चतुर रामलिंगम (ओमी वैद्य), वायरस (बोमन ईरानी) हे प्रत्येक पात्र आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. आता लवकरच ‘3 इडियट्स’ चा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे.