पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटांमध्ये काम न करू देण्याच्या वादानंतर शाहरुख खानच्या ‘रईस’ या चित्रपटातून अभिनेत्री माहिरा खान हिला चित्रपटातून न वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते.  काही वृत्तसंस्थानी दिलेल्या माहितीनुसार, माहिरा ही ‘रईस’ चित्रपटाचा भाग असणार आहे. त्यामुळे चित्रपटातील तिच्या उर्वरित दृश्यांचे चित्रीकरण गुप्त ठिकाणी करण्यात येणार असल्याचे समजते. निर्मात्यांच्या मते माहिराला काढणे चित्रपटाच्या बजेटसाठी परवडणारे नाही. सकारात्मक विचारसरणी असणारे निर्माते रितेश सिधवानी, फरहान अख्तर, अभिनेता शाहरुख खान आणि दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांच्या मते जानेवारीत हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत हे प्रकरण ब-यापैकी निवळलेले असेल.
उरी हल्ल्यानंतर भारतात काम करण्यास बॅन लावण्यात आलेल्या पाकिस्तानी कलाकारांमध्ये माहिरा खान आणि फवाद खान हे अग्रस्थानी होते. दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणारा ‘ऐ दिल है मुश्किल’ याआधीच ब-याच वादविवादांना सामोरा गेला आहे. फवाद लाहोरला परतला असून या प्रकरणात आतापर्यंत अनेक घडामोडी घडल्या आहेत. दरम्यान, ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन सुरु झालेला वाद आता शमला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई फळाला आली असून हा चित्रपट आता पूर्वनियोजित वेळेनुसार म्हणजेच २८ ऑक्टोबरलाच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, ‘रईस’चे बरेचसे चित्रीकरण पूर्ण झाले असून शाहरुख-माहिरामधील काही दृश्य चित्रीत करणे बाकी आहेत. पण, सद्य परिस्थिती पाहता मुंबईमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण होणे अशक्य आहे. त्यामुळे अबू धाबीमधील अज्ञात स्थळी चित्रीकरण केले जाणार असल्याचे म्हटले जातेय. ‘रईस’ चित्रपटाद्वारे माहिरा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असून तिने शाहरुखसोबत आधीच २० दिवसांचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. १८ वर्षाच्या मुलीपासून ते ३५ वर्षाच्या महिलेपर्यंतची व्यक्तिरेखा माहिरा चित्रपटात साकारणार आहे.
ऐ दिल है मुश्कीलच्या वादासंदर्भात शनिवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, चित्रपटाचा दिग्दर्शकर करण जोहर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.   राज ठाकरे यांच्यासह शालिनी ठाकरे, अमेय खोपकर, नितीन सरदेसाई आदी नेतेमंडळी उपस्थित होती. तर करण जोहरसोबत निर्माता असोसिएशनचे सदस्य मुकेश भट, सिद्धार्थ रॉय कपूर आदी मंडळी उपस्थित होती. सुमारे पाऊण तास ही बैठक चालली. या बैठकीनंतर मुकेश भट यांनी पत्रकारांना चित्रपट दिवाळीतच प्रदर्शित होणार असे सांगितले आहे. ते म्हणाले की, आपल्याला देशाचा अभिमान आहे आणि आपण आधी भारतीय आहोत. आमच्यासाठी व्यावसायपेक्षा देश महत्त्वाचा आहे. आज आम्ही सर्व निर्माते, दिग्दर्शक करण जोहर आणि राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटलो. यावेळी आमच्यात सकारात्मक चर्चा झाली. करण जोहरने ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यातून मिळणारा नफा शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत म्हणून देण्याची हमी दिली आहे.  तसेच, यापुढे कोणत्याही पाकिस्तानी कलाकारांना येथील चित्रपटांमध्ये घेतले जाणार नाही, असा निर्णय प्रोड्युसर असोसिएशनने घेतल्याचेही ते म्हणाले. इतकेच नाही तर ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटगृहात दाखविण्यापूर्वी एक निवेदन साजर केले जाईल. त्यात शहीदांना श्रद्धांजली वाहणारा संदेश दाखविण्यात येईल, असे मुकेश भट म्हणाले.