‘लाईफ ओके’ वाहिनीवरील ‘दि बॅचलोरेट – मेरे खयालों की मल्लिका’ या रियालिटी शोमध्ये दिसलेली मल्लिका शेरावत आता अमेरिकेतील ‘हवाई फाईव्ह-ओ’ मालिकेत दिसणार आहे. ही मालिका अमेरिकेतील गुन्हेगारी विश्वावर आधारित आहे. याबाबत टि्वटरवर प्रसिद्ध केलेल्या संदेशात मल्लिका म्हणते, सीबीएसच्या ‘हवाई फाईव्ह-ओ’ मालिकेचा भाग होण्याची संधी मिळाल्याने खूप रोमांचित झाले. याआधी मल्लिका अनेक वेळा कान आणि ऑस्करसारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उपस्थिती लावताना दृष्टीस पडली आहे. परंतु, २ मार्च रोजी पार पडलेल्या ८६व्या अॅकाडेमी अॅवॉर्डसला ती उपस्थिती लावू शकली नाही. याबाबतच्या टि्वटरवरील संदेशात ती म्हणते, शुटिंगमध्ये व्यस्त असल्याने ऑस्करला उपस्थिती लावू शकले नाही. असे असले तरी, हवाईत असल्याचा खूप आनंद होतो आहे. या मालिकेतील मल्लिकाची भूमिका गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.