गोरेगावमधील आंबेडकर नगरमध्ये घराबाहेर उघड्या गटारात पडून वाहून गेलेल्या दोन वर्षांच्या दिव्यांश सिंह याचा अद्यापही पत्ता लागलेला नाही. ३७ तास उलटल्यानंतरही त्याचा शोध सुरुच आहे. या शोध मोहिमेदरम्यान बचाव पथकाने तब्बल दहा किमी लांबीची ड्रेनेज लाईन तपासली मात्र, त्याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. या घटनेनंतर सर्व स्तरांमधून हळहळ व्यक्त होत असतानाच अभिनेता जितेंद्र जोशीनेदेखील इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली आहे.

“आज आषाढी एकादशी असल्यामुळे या दिवसाचं उदाहरण देत त्याने त्याचं मत मांडलं आहे. आज आषाढी असल्यामुळे आपण तुकोबांची भूमिका केलेला एखादा फोटो सोशल मीडियावर शेअर करुयात आणि आपल्यातील चतुरस्र अभिनेता म्हणजे काय ते सांगूयात. मात्र काही दिवसापूर्वीच गोरेगाव येथील झाकण नसलेल्या उघड्या गटारीत पडलेल्या आणि अद्यापही पत्ता न लागलेल्या दिव्यांश सिंगची आठवण आली. त्याच्या आई-वडीलांनीही आषाढी किंवा अन्य कोणते ना कोणते उपवास केलेच असतील ना”, असं म्हणतं जितेंद्रने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यासोबतच त्याने त्याचे अन्य काही विचारही मांडले आहेत.

 

View this post on Instagram

 

Part 1 आज आषाढी न? म्हटलं तुकोबाची भूमिका केलेला एखादा फ़ोटो देऊ टाकून आणि त्या निमित्ताने पुन्हा लोकांना आठवण करून देऊया आपल्यात असलेल्या विविधांगी/ चतुरस्र वगैरे की काय असतो त्या अभिनेत्याची. किंवा एखादा अभंग टाकुया किंवा आपण वारीला जात असल्याचा एखादा सेल्फी? डोक्यावर तुळस वगैरे? पण मग काही दिवसांपूर्वीच गोरेगाव येथील झाकण नसलेल्या उघड़या गटारीत पडलेल्या आणि अजूनही न सापडलेल्या दिव्यांश सिंग या चिमुकल्या बाळाची आठवण झाली. त्या बाळाची आई /बाप यांनी आषाढी किंवा इतर कुठले तरी उपवास केलेच असतील न! अहो सिंग म्हणजे हिन्दूच बहुतेक आणि हिन्दू धर्मात उपवासाला प्रचंड महत्व. बरं मुस्लमानसुद्धा रोजा (उपवास) ठेवतात. इथे धर्माचा उल्लेख या साठी केला कारण गटारात कुठल्याही धर्माचं लेकरू पडू शकतं आणि शिवाय आपल्याला आवडतं धर्म- जात वगैरे कुठली ते पाहायला/ शोधायला. मागच्या वर्षी पावसात असाच कुणीतरी डॉक्टर बुड़ाला म्हणतात. आताशा नावसुद्धा आठवत नाही त्यांचं आणि पुढल्या वर्षी या दिव्यांश चं नाही आठवणार असो तर मुद्दा असा की मला वाटू लागली प्रचंड लाज आणि घृणा या सगळ्या गोष्टी बाबत. मला वारंवार होणारा हा त्रास माझ्या आयुष्यातील आणि करियरमधील महत्वाचे क्षण काढून घेतोय आणि लक्ष विचलित करतोय. मला तर माझ्या घराचे हफ्ते भरायचे आहेत, मुंबईत पॉश जगायला पैसे कमवायचे आहेत भरपूर हा सद्विचार आला आणि इटक्यात नवीन सिनेमासाठी फोन आला व मी सर्व काही विसरून त्या कथेत गुंतत गेलो आणि आनंदी झालो. पुढच्या वर्षीच्या सर्व पुरस्कार सोहळ्यात निदान नामांकन तरी नक्की मिळेल याची खात्री वाटली आणि पुरस्कार मिळालाच तर क़ाय मनोगत व्यक्त करावं याचा विचार कर लागलो आणि मला मी स्वतः एक माकड आहे असं वाटू लागलं आणि क्षणार्धात मी बेशरम झालो. आता आता लक्षात येतंय की धरण फुटू दे, माणसं बुडू दे, बलात्कार होऊ दे, इमारती /भिंती कोसळू दे, संपूर्ण मानवजात झाड़ाडोंगरांसकट नष्ट होऊ दे मी आणि माझं कुटुंब सुखरूप असेस्तोवर मला काही ही ही फरक पडत नाही..

A post shared by jitendra shakuntala joshi (@jitendrajoshi27) on

दरम्यान, दिव्यांश गटारात पडून वाहून गेल्यानंतर बुधवारी रात्री उशीरापासून अग्निशामक दल या चिमुकल्याचा शोध घेत आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी रात्री साडे दहाच्या सुमारास दिव्यांश हा खेळताना घराबाहेर आला त्यानंतर परत घराकडे जाताना अंधार असल्याने तो चुकून जवळच्या उघड्या गटारात पडला. दिवसभर या भागात जोरदार पाऊस झाल्याने गटारातून पावसाचे पाणी वेगाने वाहत होते, या पाण्याच्या प्रवाहासोबत तो देखील वाहून गेला असावा, असे उपलब्ध सीसीटीव्हीमधील चित्रीकरणावरुन कळते.