वर्षा उसगांवकर या मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. ९० च्या दशकात त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आपल्या अभिनय व सौंदर्याच्या जोरावर त्यांनी अनेकांना वेड लावले होते. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली.

नुकतीच वर्षा उसगांवकर यांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. दरम्यान, या मुलाखतीत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या मैत्रिणीबाबतचा खुलासा केला आहे. प्रिया बेर्डे, निवेदिता सराफ की सुप्रिया पिळगांवकर यांच्यातील तुमची जवळची मैत्रीण कोण, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत त्यांनी, निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डेंचे नाव घेतले.

वर्षा उसगांवकर यांनी १९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘गंमत-जंमत’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्या काळी निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगांवकर व प्रिया बेर्डे या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. मात्र, या सगळ्यांमधून वर्षा उसगांवकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली होती. आजही त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे.

हेही वाचा- प्रसाद ओक याला वाढदिवसानिमित्त अमृता खानविलकरने दिले ‘हे’ महागडे गिफ्ट, फोटो शेअर करत म्हणाला…

वर्षा यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास हमाल दे धमाल, अफलातून, सवत माझी लाडकी, गंमत जंमत, बायको चुकली स्टॅंडवर या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका खूपच गाजल्या. तर हिंदीत त्यांनी साथी, परदेसी, घरजमाई या चित्रपटांत काम केले. सध्या त्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत त्यांनी साकारलेल्या माई या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.