अभिनेत्री मुक्ता बर्वे व नम्रता संभेराव यांची मुख्य भूमिका असलेला ‘नाच गं घुमा’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसत आहे. परेश मोकाशी यांचं दिर्ग्दशन असलेला या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील आशाताई आणि राणीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. काल राणी म्हणजेच अभिनेत्री मुक्ता बर्वेचा वाढदिवस होता. त्यामुळे मनोरंजनसृष्टीतील कलाकार मंडळींसह चाहत्यांनी मुक्तावर शुभेच्छा वर्षाव केला. अजूनही अभिनेत्रीला वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशातच नम्रता संभेरावने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे; जो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

काल नम्रता संभेरावने मुक्ता बर्वेच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट लिहिली होती. मुक्ताबरोबरचा फोटो शेअर करत नम्रताने लिहिलं होतं, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मुक्ता ताई. तू माझा आदर्श, माझी प्रेरणा आहेस…तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत…आपला चित्रपट सुपरहिट झाला ताई…तुझ्यासारख्या दिग्गज बलाढ्य अभिनेत्रीसमोर उभं राहण्याची ताकद मला तुझ्यामुळेच मिळाली कारण तू खूप आपलंस केलंस. मला एवढं बळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! मी तुझी अजून मोठी चाहती झाले आणि आता तू माझी मैत्रीण सुद्धा झालीस म्हणून थोडी कॉलर पण टाईट झालीय. लव्ह यू ताई.”

हेही वाचा – ‘कन्यादान’ फेम अभिनेत्याच्या आईचं निधन, कर्करोगाशी झुंज झाली अपयशी, भावुक होतं म्हणाला, “माझी आई…”

नम्रताने या पोस्टनंतर मुक्ताला शुभेच्छा देतानाचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत, नम्रता हातात केक घेऊन मुक्ताला शुभेच्छा देताना दिसत आहे. पण नंतर मजेशीर अंदाजात नम्रता शुभेच्छा देऊ लागते तेव्हा मुक्ता ते ऐकून तिथून पळूनच जाते.

नम्रता आणि मुक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवाय मुक्ताला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘कलर्स मराठी’च्या ‘रमा राघव’ मालिकेनं ४०० भागांचा टप्पा केला पार, कलाकारांनी ‘असं’ केलं सेलिब्रेशन

नाच गं घुमा’ चित्रपटाने किती कमावले?

दरम्यान, सॅकनिक्लने दिलेल्या रिपोर्टनुसार, मुक्ता आणि नम्रताच्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटाने सोमवार १३ मेपर्यंत १५.०५ कोटींचा व्यवसाय केला आहे. प्रदर्शनानंतरच्या पहिल्या दिवशीच या चित्रपटाने २.१५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर कमाईत घट झाली पण वीकेंडला पुन्हा कमाईत वाढ झाली.