सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. सोशल मीडियावर दोघेही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सिद्धार्थ व मितालीने २०२१ साली लग्न केले. दरम्यान, एका मुलाखतीत सिद्धार्थने लग्नानंतर पहिल्यांदाच त्याच्या सासू सासऱ्यांबद्दल भाष्य केले आहे.

सिद्धार्थ व मितालीने नुकतेच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले. या मुलाखतीत सिद्धार्थ लग्नानंतर पहिल्यांदाच त्याच्या सासू-सासऱ्यांबद्दल बोलला आहे. तो म्हणाला, “मला जसं सासर हवं होतं अगदी तसंच आहे. कारण माझ्या सासूबाई माझी मैत्रीण आहे. माझ्या सासऱ्यांना खूप गप्पा मारायला आवडतात. जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा त्यांना मला खूप भरभरून सांगायचं असतं. त्यांना बोलायला आवडतं हे बघून मला खूप आनंद होतो. माझे सासरे मित्रासारखे आहेत, ते खूप मोकळ्या स्वभावाचे आहेत. मी माझ्या सासू- सासऱ्यांबरोबर हॅग आऊट करू शकतो.”

सिद्धार्थ आणि मितालीने २०१८ मध्ये व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. ‘येस, येस, येस #व्हॅलेंटाईन डे’ अशी कॅप्शन देत मितालीने फोटो शेअर केला होता. अनेकदा दोघे सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात. लग्नाच्या अगोदर दोघे दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. एकमेकांना जाणून घेतल्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये साखरपुडा केला. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. नुकतेच त्यांच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत.

हेही वाचा- ‘सत्यप्रेम की कथा’ च्या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा साखरपुडा, कियारा अडवाणीने फोटोवर केलेली कमेंट चर्चेत

सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर आतापर्यंत त्याने अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचे ’झिम्मा २’ व ’ओले आले’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांनी चांगलीच कमाई केली, तर २ फेब्रुवारीला त्याचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री सई ताम्हणकरची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना सई व सिद्धार्थची ‘अरेंजवाली लव्ह स्टोरी’ बघायला मिळत आहे, तर मिलाती सध्या अभिनयापासून लांब असली तरी सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. मितालीला फिरण्याची खूप आवड आहे, ती नेहमी निरनिराळ्या देशांना भेट देत असते.