रेश्मा राईकवार

एखादा विषय रोजच्या आयुष्यात अनेकदा अनुभवाला येतो. त्या त्या समस्येशी झुंजताना विशेषत: आरोग्यविषयक प्रश्नाचा सामना करताना आर्थिकदृष्टया येणारी हतबलता अनेकांना नैराश्याच्या गर्तेत ढकलून जाते. एक मोठा वर्ग आजही असा आहे जो मोठमोठया आजारपणाशी केवळ आर्थिक सक्षमता नसल्याने आणि सरकारकडून आर्थिक मदत मिळत नसल्याने लढू शकत नाही. त्यांच्यासाठी एक योग्य, सक्षम व्यवस्था उभी राहायला हवी हा महत्त्वाचा विषय ‘सूर लागू दे’ या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक प्रवीण विजया एकनाथ बिर्जे यांनी केला आहे.

Commenting on the problems of senior citizens Old furniture marathi movie Director Mahesh Manjrekar
रंजक नाटय़ाची फोडणी
Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित

‘सूर लागू दे’ या चित्रपटाचं कथालेखन आशीष देव यांनी केलं आहे. या कथेच्या केंद्रस्थानी एक वृद्ध जोडपं आहे. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात आपला मुलगा आणि सून यांना गमावलेलं हे वृद्ध दाम्पत्य जमेल तशी काटकसर करत आपल्या नातवंडांना वाढवतं आहे. निवृत्तीचं वय उलटलं असलं, शरीर थकलं असलं तरी नातवंडांना मोठं करायचं आहे, त्यांच्यासाठी जगायचं आहे हा विचार आजोबांच्या मनातली कामाची ऊर्मी वाढवत राहतो. मात्र या वयातही नोकरी कशासाठी शोधताय? म्हणून टोमणे त्यांना ऐकून घ्यावे लागतात. दुसरीकडे आपल्या नवऱ्याची दगदग लक्षात घेत त्याला होता होईल ती मदत करत संसाराचा गाडा चालवण्याचं आजीचं काम सुरू आहे. चाळीतील एकमेकांशी प्रेमाने जोडली गेलेली माणसं आणि आहे त्यातही आनंदाने जीवन व्यतीत करणारं हे दाम्पत्य. या आजी-आजोबांचा नातू मनूला रक्ताच्या कर्करोगाचं निदान होतं. त्याला वाचवण्यासाठी २० ते २५ लाख रुपये खर्च करून शस्त्रक्रिया करावी लागणार, शिवाय केमोथेरपी आणि औषधांचा खर्च वेगळा लागेल हे डॉक्टरांचं म्हणणं ऐकून आजी-आजोबांच्या पायाखालची जमीन सरकते. तरी आलेल्या परिस्थितीला धीराने तोंड देण्याच्या प्रयत्नात या दोघांना आलेले वाईट अनुभव, सरकारी योजनांच्या नावाखाली होणारी फसवणूक, वैद्यकीय आर्थिक मदत देण्यासाठी पावलापावलावर उभ्या ठाकलेल्या सामाजिक संस्थांचा फसवा कारभार, रुग्णाच्या परिस्थितीचा विचार न करता केवळ पैसा कमावण्यासाठी धडपडणारे डॉक्टर असे कित्येक नकारी अनुभव पचवताना त्यांचं खचत जाणं, चाळीतल्या लोकांच्या प्रेमामुळे मिळालेली उभारी, आशा-निराशेच्या हिंदूोळयावर एकमेकांना सावरून घेणाऱ्या या पती-पत्नींचं नातं अशा कित्येक पैलूंवर कथेच्या ओघात लेखक आशीष देव यांनी प्रकाश टाकला आहे.

हेही वाचा >>> नंत महादेवन यांच्या चित्रपटाची घोषणा

 या कथेची थोडयाशा जुन्या वळणाची आणि काहीशी नाटयमय वाटावी अशी दिग्दर्शकीय मांडणी प्रवीण विजया एकनाथ बिर्जे यांनी केली आहे. मुळात विषयातच भावनाटय पुरेपूर आहे आणि ते पडद्यावर रंगवण्यासाठी विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळय़े यांच्यासारखे दोन मोठे ताकदीचे कलाकार दिग्दर्शकाकडे होते. त्यामुळे त्यांच्या अभिनयातून हे नाटय सहजपणे पडद्यावर उतरवणं शक्य होतं. विक्रम गोखले यांची भूमिका असलेला हा अखेरचा चित्रपट. आणि शेवटच्या काळात आजारपणातून उठून त्यांनी हा चित्रपट पूर्ण केला. त्यांचं आजारी असणं पडद्यावर काही प्रमाणात जाणवत असलं तरी त्यांच्या अभिनयाची ताकद कुठेही कमी पडलेली नाही. उलट त्यांच्या अभिनयासाठी आणि सहज नैसर्गिक अभिनयातील ताकद काय असते हे अनुभवण्यासाठी ‘सूर लागू दे’ हा चित्रपट पाहायला हवा. सुहासिनी मुळय़े याही ताकदीच्या अभिनेत्री आहेत, मात्र या चित्रपटात सुरुवातीच्या काही प्रसंगात त्या चाचपडताना दिसतात. हिंदीतच खूप काम केलेलं असल्याने मराठी संवाद म्हणताना उच्चारातील अडचणी आणि आधीच नाटयमय मांडणी असलेल्या चित्रपटात तशाच पद्धतीची संवादफेक यामुळे त्यांची भूमिका पाहताना सुरुवातीला अपेक्षाभंग होतो. त्या तुलनेत चित्रपटाच्या उत्तरार्धात त्यांनी आपल्या भूमिकेचा सूर अचूक पकडला आहे. आरोग्यविषयक समस्यांशी झगडताना रुग्णालय प्रशासन, सरकार सगळयाच स्तरांवरून अनुभवाला येणारी उदासीनता आणि मदतीचे सगळेच मार्ग बंद झाल्यावर होणारी कोंडी, एकाकी-कोणाच्याही आधाराविना जगणाऱ्या वृद्धांच्या समस्या कालही होत्या आणि आजही त्या प्रखरतेने जाणवाव्यात अशा आहेत. त्यामुळे ‘सूर लागू दे’ या चित्रपटातून केलेली त्या विषयाची मांडणी महत्त्वाची ठरते, मात्र आजच्या काळाची गरज असलेला हा विषय सत्तर-ऐंशीच्या दशकाशी साधर्म्य दाखवतील अशी चाळीची रचना, त्यातील निवडक पात्रांची कल्पना म्हणजे एखादा दारुडा, एखाचा चेष्टेचा विषय ठरलेला वृद्ध, एखादं प्रेमी जोडपं असे ठरावीक ठोकताळे डोळयासमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे. जी आजच्या काळाशी सुसंगत ठरत नाही. कलाकारांमध्ये रीना मधुकर, आशिष नेवाळकर, मेघना नायडू हे चेहरे वेगळे असले तरी मुळात त्यांच्या व्यक्तिरेखांना कथेत फारसा वाव मिळालेला नाही. मेघनाची व्यक्तिरेखा आणि तिची गोष्टच चित्रपटात अर्धवट सोडून देण्यात आली आहे. त्याउलट, गणपतीचं गाणं वगैरे प्रसंग विनाकारण आल्यासारखे वाटतात. सुरुवातीला येणारं शीर्षकगीत त्यातल्या त्यात श्रवणीय झालं आहे. विषयाचं महत्त्व आणि विक्रम गोखले यांचा अभिनय ही ‘सूर लागू दे’ या चित्रपटाची मोठी जमेची बाजू ठरली आहे.

सूर लागू दे

दिग्दर्शक – प्रवीण विजया एकनाथ बिर्जे

कलाकार – विक्रम गोखले, सुहासिनी मुळये, रीना मधुकर, मेघना नायडू, आशीष नेवाळकर, जयराज नायर, सुनील गोडबोले, सिद्धेश्वर झाडबुके, नीतीन जाधव.