|| रवींद्र पाथरे

गेल्या काही वर्षांत महानगरीय संवेदनांच्या अंतरंगात शिरून त्याचा तळ ढवळणाऱ्या कथा लिहिणाऱ्यांत जयंत पवार हे नाव आघाडीवर आहे. संवेदनशील नाटककार म्हणून त्यांची ओळख आहेच; पण मधल्या काळात आपली ही ओळख काहीशी बाजूला ठेवत त्यांनी महानगरीय कनिष्ट मध्यमवर्ग आणि दलित-शोषितांचं विश्व चितारणाऱ्या कथा लिहिण्याचा धडाका लावला. त्यातूनच त्यांचे ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ आणि ‘कोन नाय कोण्चा..’ हे कथासंग्रह आले. भाऊ पाध्येंशी नातं सांगणाऱ्या कथा जयंत पवार यांनी लिहिल्या यात नवल नाही. भाऊ पाध्येंच्या कथांनी ते प्रभावित होण्याचं कारण त्यांची स्वत:ची जडणघडणही गिरणगावात झालीय. त्याचं अंतर्बाह्य़ रूप त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलंय. सहानुभूतीपूर्वक ते उमजून घेतलंय. या परिसरातली माणसं, त्यांचं जगणं (विशेषत: गिरणी संपोत्तर काळातलं!) याकडे आस्थेवाईकपणे पाहणारा लेखक म्हणून जयंत पवार यांच्याकडे पाहावं लागेल. साहजिकपणेच या अनुभूतीतून त्यांची कथा प्रसवलीय. माणूस व लेखक म्हणून असलेली त्यांची तीव्र संवेदनक्षमता त्यांच्या कथेतून स्पष्टपणे जाणवते. नव्वदोत्तरी काळात कथालेखन करत असताना जयंत पवार यांना जागतिकीकरणोत्तर बदललेल्या परिस्थितीचंही समग्र अन् सजग भान आहे. १९९१ मध्ये आपण खासगीकरण व आर्थिक उदारीकरणाचा स्वीकार केल्यानंतर जी प्रचंड वावटळ उठली, तिने संपूर्ण समाजजीवन घुसळून निघाले. त्याचे तर ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेतच; त्याचबरोबर या सांधेबदलाचे झटके व्यक्ती म्हणून त्यांनीही अनुभवले. त्यातून समाजाच्या सर्वच स्तरांत झालेले क्रांतिकारी बदल त्यांनी बारकाईने टिपले आणि त्याचे पडसादही त्यांच्या या कथालेखनात उमटले.

जयंत पवार यांनी नाटय़लेखनात काहीसा विराम घेतला असला तरी त्यांच्या कथांमधील ‘नाटय़’ इतर नाटकवाल्यांना मात्र खुणावत राहिलं. त्यातूनच मग ‘टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन’ या कथेवरील रंगाविष्कार सादर झाला. अतुल पेठेंनी त्यांच्या ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ या रहस्यमय कथेचं एकपात्री सादरीकरण केलं. आणि आता ‘स्वभाव, कल्याण’ या संस्थेनं त्यांच्या ‘साशे भात्तर रुपयांचा सवाल अर्थात युद्ध आमुचे सुरू’ या कथेवर आधारित ‘६७२ रुपयांचा सवाल’ हे नाटक मंचित केलं आहे. एका क्षुल्लकशा घटनेतही समाजमानसात चक्रिवात निर्माण करण्याची शक्यता कशी दडलेली असते, हा अनुभव ही कथा देते. ‘नॉन-इश्यू’तून ‘इश्यू’ कसा ‘घडवला’ जातो, त्याची ही गोष्ट..

सोपारवाडी एरियातील सिद्धेश अपार्टमेंट या कथित सुसंस्कृत वस्तीला लागूनच जिजाबाई नगर ही झोपडपट्टी वाढत जाते. सिद्धेश अपार्टमेंटमधील सुखवस्तू लोकांना घरकाम, इलेक्ट्रिक सेवा, दूधपुरवठा, प्लंम्बिंग आदी सेवा पुरवण्याचं काम जिजाबाई नगरातील लोक करतात. वरपांगी जरी या दोन वस्त्यांमधील संबंध सौहार्दाचे असल्याचं भासत असलं तरी सिद्धेश अपार्टमेंटवाल्यांना आपल्या सुसंस्कृत अधिवासाला चिकटून फोफावलेली जिजाबाई नगररूपी खरूज नकोशी वाटत असते. नाइलाजास्तव त्यांना तिथल्या माणसांना जवळ करावं लागतं. पण ही खदखद सुप्तपणे त्यांच्या मनात असतेच. आणि इकडे जिजाबाई नगरात किडय़ा-मुंग्यांचं आयुष्य जगणाऱ्या लोकांना या बिल्डिंगवाल्या वर्गाबद्दल सुप्त असूया व चीड असणंही स्वाभाविकच. तरीही परस्परावलंबी असल्यानं त्यांच्यातले ‘व्यवहार’ सुरळीत सुरू राहतात.

मात्र, ‘सिद्धेश’मधल्या भाऊ आवळस्करांकडे दुधाचा रतीब टाकणाऱ्या बळी जंगमचं दोन महिन्यांचं बिल त्यांनी थकवल्यामुळे एके दिवशी उभयतांत ठिणगी पडते. बळीने अनेकदा बिलाबद्दल तगादा लावूनही भाऊंची पत्नी रमाबाई हिच्या म्हणण्यानुसार, तिने एका महिन्याचं ६७२ रुपये बिल दिलेलं असल्याने बळी ते पुन्हा का मागतोय असा प्रश्न तिला पडला आहे. हातावर पोट असलेला बळी वारंवार मागूनही आपले पैसे मिळत नाहीत म्हणून अखेर चिरडीला येतो. तशात भाऊ आवळस्कर त्याच्यावर हेत्वारोप करून बोलू नये ते त्याला बोलतात. त्याने बळीचं डोकं सणकतं. ‘कसे पैसे देत नाहीत तेच बघतो..’ असं म्हणत तो भाऊंच्या घरी तमाशा करतो. शेजारपाजाऱ्यांसमोर झालेल्या या बेअदबीमुळे भाऊही इरेला पेटतात. ‘बिल देणार नाही. काय करायचं ते कर..’ असं बळीला धमकावतात. चिल्लर भाईगिरी करणारा बळीचा धाकटा लेक नरेश भाऊंच्या मुलाला- सच्चिदानंदला भररस्त्यात ‘पैसेचोर’ म्हणतो आणि प्रकरण अकस्मात पेटतं. भाऊ बळीविरुद्ध पोलिसांत तक्रार करतात. पोलीस बळीला पकडून चांगलाच चोप देतात. जिजाबाई नगरातला गावगन्ना पुढारी पोलिस स्टेशनला जाऊन बळीची सुटका करतो. बळीला सज्जड दम देऊन सोडण्यात येतं. आपल्या बापाला झालेल्या पोलीस मारहाणीमुळे बळीचा पोरगा पिसाटतो. तो सिद्धेशवाल्यांविरुद्ध आपल्या वस्तीतल्या लोकांना भडकवतो. त्यांच्याकडे कुणीही कामाला जायचं नाही असं ठरवण्यात येतं. त्यामुळे सिद्धेश अपार्टमेंटवाले जेरीस येतात. किंचितसे नरमतात. परंतु भाऊंची सून क्रांतीगीता यावर ऑनलाइन सर्व गोष्टी मागवण्याचा मार्ग सुचवते. क्रांतीच्या उपायामुळे आपलं शस्त्र निष्प्रभ ठरल्यानं जिजाबाईवाले आता ‘आर या पार’ची लढाई छेडायचं ठरवतात..

अर्थात पुढे हा शह-काटशहचा खेळ युद्धात रूपांतरित होतो. त्यातही सामंजस्यवादी, विद्रोही, शत्रू असे गट-तट पडत जातात. एका क्षणी या सगळ्याचाच स्फोट होतो. भयंकर विनाश घडतो. या गदारोळातच भाऊंच्या मुलीने बळीच्या थोरल्या मुलाबरोबर पळून जाऊन लग्न केल्याची वार्ता येते आणि मग मूळ प्रकरण भलतंच वळण घेतं..

‘आहे रे’ व ‘नाही रे’ वर्गातलं हे सनातन युद्घ जयंत पवार यांनी कथेत काहीशा संयतपणे मांडलं आहे. पण त्याचं नाटय़रूपांतर करताना  स्वप्नील आजगांवकर यांनी त्यात मीडियाला आणून मूळ कथेत आणखीन ट्विस्ट आणला आहे. परिणामी हा ‘हाय होल्टेज ड्रामा’ अत्यंत संघर्षमय, तसाच उत्कंठावर्धक झाला आहे. मूळ कथेत मीडियाचं सूचन असलं तरी नाटकात त्यास केंद्रस्थानी आणलं गेलं आहे. माणसाच्या जगण्यावर मीडियाचं झालेलं अतिक्रमण नाटककर्त्यांना त्यातून सूचित करायचं आहे. स्वप्नील आजगावकर व नितीन सावळे दिग्दर्शित ‘६७२ रुपयांचा सवाल’मध्ये प्रत्येक पात्रांचे बारीकसारीक तपशील, वर्तन, परस्परसंबंध व त्यातले ताणेबाणे अधिक ठाशीव करण्यात आले आहेत. मानवी संबंधांतील ताण त्यातून अधोरेखित होतात. दोन भिन्न आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक वर्गातील दरी व त्यामुळे त्यांच्यात आधीच असलेले तणाव इथे अधिक ताणले जातात. त्यात आणखी मीडिया आगीत तेल ओतायचं काम करतो. मूल्यसंघर्षांतील दांभिकपणही इथे पृष्ठभागी येतो. एका क्षुल्लक घटनेला फाटे फुटत जाऊन ती हळूहळू कशी चिघळत जाते आणि काटय़ाचा नायनाटा कसा बनतो, हे यात पाहायला मिळतं. वर्गसंघर्षांबरोबरच श्रेष्ठ-कनिष्ठतेची दरीही भाऊ आवळस्कर आणि बळी जंगम यांच्या मुलांच्या लग्नसंबंधांत कळीची भूमिका बजावते. त्यामुळेच बळी जंगमला आपल्या पोराचं बीज भाऊच्या मुलीच्या पोटी रुजतंय याचा आसुरी आनंद होतो. तर भाऊंना आपला, आपल्या श्रेष्ठत्वाचा तो दारुण पराभव वाटतो. सामाजिक संघर्षांचं असं व्यक्तिगत पातळीवर येणं, हीसुद्धा या नाटकाची एक मिती आहे. त्यात सामंजस्याने समस्या सोडवू पाहणाऱ्या माजी न्या. भांडारकरांचा जाणारा बळी हा आजच्या सामाजिक वास्तवावरचं करकरीत भाष्य आहे. पोलीस यंत्रणा नामक व्यवस्थेचं दुखणंही यानिमित्तानं समोर येतं. एकुणात अनेकपदरी, सोलीव वास्तव सर्वागानं मांडणारं हे नाटक ‘आज’बद्दल महत्त्वाचं विधान करू मागतं. मात्र, नाटकातील काही प्रसंगांना कात्री लावून ते अधिक धारदार करता येऊ शकेल.

सूचक नेपथ्य व कमीत कमी प्रॉपर्टीतून विविध नाटय़स्थळं यथार्थतेनं उभी केली गेली आहेत. श्रीधर मेनन-सूरज जाधव यांचं पाश्र्वसंगीत नाटकातले संघर्षपूर्ण क्षण तसंच करुणार्त प्रसंग गडद करतं. राजेश शिंदे यांच्या प्रकाशयोजनेनं यातलं ‘नाटय़’ अधिक जोरकस बनवलं आहे.

सर्वच कलावंतांनी आपल्या भूमिका जीव ओतून केल्या आहेत. विशेषत: सिद्धेश अपार्टमेंट आणि जिजाबाई नगरवासीयांतील हाणामारी अंगावर काटा आणते. तसंच पोलीस यंत्रणेची गोची आणि त्यांची तारेवरची कसरत खूप काही सांगून जाते. स्वप्नील आजगांवकर (चॅनल रिपोर्टर भानू जगदाळे) आणि मधुर म्हात्रे (टीपर) यांनी नाटकातील नाटय़ाची खुमारी वाढती राहील याची नीट खबरदारी घेतली आहे. चंद्रास कांबळे हे बळी जंगमची भूमिका अक्षरश: जगले आहेत असं म्हटल्यास अनुचित ठरणार नाही. भाऊ आवळस्कर झालेले जयकेश मिश्रा भुसा भरलेल्या वाघाचं अंगात आलेल्या वाघात होणारं रूपांतर उत्तम साकारतात. पोलीस इन्स्पेक्टर धायमोडेंचं अर्कचित्र प्रसाद मुसळे यांनी छान रंगवलं आहे. सरळमार्गी, न्यायप्रिय भांडारकरांची सार्वत्रिक उपेक्षा आणि मानखंडना प्रतीक पाटील यांनी नेमकी दाखवली आहे. बाकी, रमाबाई (अलका बोटे), सच्चिदानंद (दिव्येश म्हात्रे), क्रांतीगीता (जिमिशा तन्ना), धुरपदा (तन्वी सुर्वे), नरेश (सुदाम शेलार) आणि इतरही सर्वानी आपल्या कामास न्याय दिला आहे. एक उत्तम विचारप्रवर्तक नाटक पाहिल्याचं समाधान हे नाटक देतं, यात काहीच शंका नाही.