सध्या ‘लग्न’ या विषयाला कलाक्षेत्रात सुगीचे दिवस आहेत. लग्नाभोवती फिरणाऱ्या मालिका, चित्रपट व नाटकांचं उदंड पीक आलेलं आहे. गंमत म्हणजे प्रेक्षकांनासुद्धा या लग्नाच्या गोष्टींमध्ये प्रचंड रस आहे. त्यातल्या वास्तव-अवास्तव, कल्पित-अकल्पित घटना-प्रसंगांमध्ये ते गुंगून जातात. त्यातल्या पात्रांचं भावविश्व त्यांना आपलंसं वाटतं. त्यांच्या कथित सुखदु:खामध्ये, हर्ष-खेदात ते मन:पूर्वक सामील होतात. प्रेक्षकांचं हे असं आभासी विश्वात गुंतणं म्हणजे एका अर्थी दैनंदिन आयुष्यातील रूक्ष, कठोर, त्रासदायी वास्तवापासून पलायन आहे की काय, असंही कधी कधी वाटतं. ते काहीही असो; पण सध्या त्यामुळे लग्नाच्या अनेक ‘गोष्टी’ जन्माला येत आहेत खऱ्या. आयरिस प्रॉडक्शन्स निर्मित ‘लुकाछुपी’ हे नाटक ही ‘लग्ना’च्या या माळेतली ‘चौथी’ गोष्ट! ‘लुकाछुपी’त प्रशांत दामले-कविता लाड अभिनित ‘एका लग्नाची गोष्ट’मधली रोमॅंटिक, तरल प्रेमकहाणीच काही क्षण आपण पुन्हा पाहतो आहोत असा भास होतो. विशेषत: यातल्या रोमॅंटिक गाण्यांच्या वेळी तर खासच!  
‘लुकाछुपी’चं कथानक तद्दन बेतीव आहे. कारण ३५ वर्षांचा घोडनवरा होईतो जो श्रीरंग विवाह मंडळाचे उंबरठे झिजवत राहतो, तोवर पाहिलेल्या ८४ मुलींपैकी ७९ मुलींनी त्याला आणि त्यानं पाच मुलींना नकार दिलेला असतो; वय उलटून गेलं तरी मुलाचं लग्न जमत नाही, या चिंतेनं ग्रासलेली श्रीरंगची आई अखेरीस त्याला- ‘तू आता प्रेमविवाह करून टाक, जिथं कुठं तुझ्या आवडीची मुलगी मिळेल तिथून तिला शोध आणि एकदाचं लग्न कर रे बाबा!’ असं सांगते काय; आणि त्याच्या मनात आपली भावी जोडीदार म्हणून सुप्तपणे वावरणारी बॅंकेतील त्याची सहकारी शुभ्रा खानविलकर (आधी) त्याच्या स्वप्नात, अन् मग प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यात येते काय.. सगळंच स्वप्नवत! आणि नेमकी त्याचवेळी त्याची कोल्हापूरची बालमैत्रीण अक्षताही नोकरीनिमित्तानं त्याच्या घरी राहायला येते काय आणि एकतर्फीच त्याच्या प्रेमात बुडून जाते काय.. सगळंच अविश्वसनीय! इतकी वर्षे ज्याचं लग्न ठरता ठरत नव्हतं त्या श्रीरंगच्या आयुष्यात एकदम चक्क दोन-दोन मुली येतात. परंतु श्रीरंग असतो शुभ्राच्या प्रेमात, तर अक्षता श्रीरंगच्या! आणि गंमत म्हणजे हे धड त्या तिघांना माहीतही नसतं. कधी नव्हे तो आपला भिडस्त मुलगा शुभ्राच्या प्रेमात पडलाय, यानं त्याच्या आईलाही अत्यानंद होतो. त्यानं तिला झटपट लग्नाचं विचारावं असा लकडा ती त्याच्याकडे लावते. शुभ्राला मात्र श्रीरंग अक्षताच्या प्रेमात पडलाय असं वाटतं. ती त्यांना परस्परांचा सहवास मिळावा म्हणून सिनेमाची तिकिटं आणून देते. तीही प्रेमत्रिकोणावरील चित्रपटाची (?)! अक्षताला तर काय, आभाळच ठेंगणं होतं. श्रीरंग मात्र तो चित्रपट पाहून वैतागतो. सिनेमातल्या प्रेमत्रिकोणाची सोडवणूक त्याला ‘भयंकर’ वाटते. शुभ्रानं त्यांना चित्रपटाची तिकिटं देण्यामागचा तिचा हेतू त्याच्या लक्षात येतो आणि तो बिथरतो. अक्षता त्याची सख्खी मैत्रीण जरी असली, तरी तिला प्रेयसी म्हणून त्यानं कधीच कल्पिलेलं नसतं. तिनं मात्र वयात आल्यापासून आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून त्याला मनीमानसी पुजलेलं असतं. आपलं प्रेम व्यक्त करण्याची ही आयती संधी चालून आली म्हणून ती खूश होते.
पण.. पण श्रीरंग तिला वस्तुस्थितीची जाणीव करून देतो. मैत्रीण म्हणून ती आपल्याला प्रिय असली तरी सहजीवनाची स्वप्नं मात्र आपण शुभ्रासोबतच रंगवली आहेत, हे तो तिला स्वच्छ सांगतो. अक्षतासाठी हा मोठाच धक्का असतो. पण मग ती शांतपणे सगळ्याचा विचार करते आणि वास्तवाला सामोरं जायचं ठरवते. शुभ्रासोबतच्या सहजीवनासाठी श्रीरंगला शुभेच्छा देऊन ती आपल्या घरी निघून जाते.
आईच्या आग्रहामुळे आणि अक्षता प्रकरणानं पोळल्यामुळे श्रीरंग शेवटी हिंमत करून शुभ्राला मागणी घालायचं ठरवतो. त्याप्रमाणे तो तिच्यासोबत ‘रोमॅंटिक डेट’ योजून तिला मागणी घालायला जातोही..
परंतु तीच त्याला नकार देते. आपलं त्याच्यावर प्रेम नाही, आपलं फार पूर्वीच कॅप्टन निखिल निंबाळकर या तरुणाशी लग्न जमलेलं आहे, हे ती सांगून टाकते. श्रीरंगकरता हा न पेलवणारा आघात असतो. पुन्हा एकदा त्याला नकार मिळालेला असतो. त्यानं तो पुरता कोलमडतो.
आई त्याला सावरू पाहते. त्याच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या अक्षताशी लग्न कर म्हणून त्याला सांगते. पण तो त्यास ठाम नकार देतो. जिच्यावर आपलं प्रेम नाही तिला आयुष्याची जोडीदार म्हणून स्वीकारून तिच्यासोबत आयुष्य कंठणं आपल्याला अशक्य आहे; तिच्यासाठीही ते अन्यायकारक ठरेल असं तो आईला स्पष्टपणे सांगतो. त्यापेक्षा शुभ्रासारखी मुलगी मिळेपर्यंत मी थांबेन असं तो म्हणतो.
वैभव चिंचाळकर लिखित-दिग्दर्शित ‘लुकाछुपी’ हे नाटक फॅन्टसी अन् कठोर वास्तव यांच्या संघर्षांतून आकाराला येतं. भिडस्त स्वभावाच्या तरुणाची लग्न न जमल्यानं होणारी शोकांतिका त्यात मांडली आहे. फॅन्टसीद्वारे सुखात्मिकतेच्या वाटेनं जाणारी ही गोष्ट मधेच वास्तवाच्या जमिनीवर उतरते आणि मानवी जीवनातील असह्य़ तिढय़ापाशी येते. मात्र, लेखक म्हणून चिंचाळकर ती मांडताना गोंधळलेले वाटतात. यातली फॅन्टसी आणि वास्तव यांच्यातील सीमारेषा कधी कधी पुसली जाते आणि प्रेक्षक संभ्रमात पडतात. या दोन्हीची मधेच सरमिसळ होते आणि खरं काय अन् स्वप्नवत काय, याबद्दलचा गोंधळ वाढत जातो. शुभ्रा ही जर श्रीरंगच्या मनातली फॅन्टसी असेल तर त्याची आईही तिला भावी सून म्हणून कशी स्वीकारते? शुभ्राचं श्रीरंगच्या घरी येणं ही फॅन्टसी आहे. मान्य! परंतु त्यानंतर मोबाइल देण्याच्या निमित्तानं ती पुन्हा त्याच्या घरी येते. त्यावेळी शुभ्रा आणि श्रीरंगच्या आईत जो संवाद घडतो, तो शुभ्रा व श्रीरंगमध्ये ‘कुछ तो है’ हाच समज निर्माण करणारा आहे. त्या दोघांमधले संवादही स्वप्न-वास्तवातली सीमारेषा पुसून टाकतात. त्यामुळे गैरसमजातून परस्परांचं प्रेम गृहीत धरण्याची चूक शुभ्रा, श्रीरंग व अक्षता सगळ्यांकडूनच होते. अर्थात हा भाग सादरीकरणदृष्टय़ा उत्तम वठला अाहे. मात्र, त्यानंतर योगायोग आणि बेतलेपणाची मालिकाच सुरू होते. मनमोकळ्या शुभ्राला श्रीरंगला आपलं लग्न जमलेलं आहे हे सांगायला आठ वर्षे का लागावीत? तेही तो आपलं तिच्यावरचं प्रेम व्यक्त करायच्या वेळी? भिडस्त असला, तरी अक्षताचं आपल्यावरचं प्रेम न कळण्याइतपत श्रीरंग माठ का आहे? ज्या मुलाचं भिरुतेपायी पस्तिशीपर्यंत लग्न जमलेलं नाही, तो अचानक आईनं सांगितल्यावर प्रेमविवाहाचा पर्याय स्वीकारायला लगोलग राजी होईल? शुभ्रावरील प्रेमापोटी अक्षताला नाकारणारा श्रीरंग पुढे कधीकाळी शुभ्रासारखीच (ती नव्हे!) मुलगी मिळाली तर सुखी होईल? हे कुठलं लॉजिक? त्यापेक्षा आईच्या म्हणण्याप्रमाणे अक्षताला वस्तुस्थिती स्पष्ट सांगून (नाही तरी ती त्याची जीवलग मैत्रीण आहेच. तिचं त्याच्यावर जीवापाड प्रेमही आहे. त्यामुळे ती त्याला त्याच्या दुखऱ्या जखमेसह स्वीकारून त्याला आपल्या प्रेमानं जिंकून आपलंसं करण्याची शंभर टक्के शक्यता असताना) त्यानं तिच्याशी लग्न करण्यानं काय बिघडणार होतं? एवीतेव्ही दुसऱ्या कुठल्यातरी मुलीत तो शुभ्रालाच तर शोधणार होता! तिचीही तर फसवणूक होणार आहेच. त्यापेक्षा निदान अक्षताला सगळं माहीत तरी आहे. त्याच्या वेदनेसह ती त्याला स्वीकारायला तयार होईलही. त्यामुळे श्रीरंगचं अखेरचं टाहो फोडणं कृतक वाटतं. आपल्याला नेमकं काय हवंय, याबाबतीत तो पुरता गोंधळलेला आहे. असो.
एवढे सगळे प्रश्न पडत असूनही नाटक आपल्याला धरून ठेवतं ते त्याच्या उत्तम निर्मितीमूल्यांमुळे! दिग्दर्शक म्हणून वैभव चिंचाळकर यांनी या प्रेमकथेतील त्रिकोणाचे नाजूक धागे, त्यातली तरलता, व्यक्तिरेखांची गुंफण उत्तमरीत्या रंगमंचावर सादर केली आहे. विशेषत: श्रीरंगच्या आईनं मुलाच्या लग्नाचा सदोदित ध्यास घेतलेलं रूप त्यांनी ज्या तऱ्हेनं पेश केलं आहे, त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच. प्रेमाचे नानाविध विभ्रम, त्यातली घालमेल, उत्कटता आणि आसुसलेपण , मनोभंग इत्यादी त्यांनी पात्रांकडून ज्या तऱ्हेनं लीलया काढून घेतलं आहे, तेही लाजवाब. तथापि लेखक म्हणून संहितेतले दोष त्यांच्यातल्या दिग्दर्शकाला आकळलेले नाहीत, किंवा बुद्धय़ाच त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असावं.
नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी उभं केलेलं श्रीरंगचं मध्यमवर्गीय घर, कॉफी हाऊस आणि बॅंकेचं ऑफिस अप्रतिम! राजन ताम्हाणे यांच्या प्रकाशयोजनेनं फॅन्टसी तसंच वास्तव अधोरेखित करताना प्रकाशाचा योजलेला पोत आणि रंग आशयाला बळकटी देतात. हर्षदा खानविलकर यांची वेशभूषा नाटकाला प्रसन्नपण बहाल करते. मिलिंद जोशी यांनी संगीतबद्ध केलेली दोन्ही अलवार गाणी नाटकाचा मूड स्थापित करतात. समीर सामंत यांची ही गाणी प्रेक्षकांच्या ओठांवर रुळायला हरकत नाही. दीपाली विचारे यांची नृत्यरचनाही त्यास हातभार लावते. या सर्वाच्या योगदानाने नाटकाच्या देखणेपणाला चार चॉंद लावले आहेत.
अभिजीत केळकर यांनी भिडस्त स्वभावाचा श्रीरंग संयमितपणे उभा केला आहे. त्याच्या मनातली आंदोलनं त्यांच्या चेहऱ्यावर सहजगत्या उमटतात. घोडनवरा झालेल्या तरुणाच्या व्यथावेदना त्यांनी प्रत्ययकारीतेनं व्यक्त केल्या आहेत. शुभ्रा आणि अक्षता यांच्यात निवड करण्याच्या क्षणांतलं अवघडलेपण, अक्षताला न दुखावता तिची समजूत काढतानाची उडणारी त्रेधातिरपीट त्यांनी अव्यक्तातूनही बोलकी केली आहे. पूर्वा गोखले यांनी मनमोकळी शुभ्रा स्वाभाविक वागण्या-वावरण्यातून नेमकेपणी साकारली आहे. भावनात्मक प्रसंगात मात्र त्या तितक्याशा सहज वाटत नाहीत. श्रीरंगच्या मनावर आलेलं मळभ दूर करण्याइतकं त्यांचं अस्तित्व व वावर चैतन्यदायी आहे. अक्षताचं अवखळ, लोभस रूप सुपर्णा श्याम यांनी छान वठवलं आहे. नवथर तरुणीचं पहिलंवहिलं प्रेम, त्यातलं थ्रिल, अकल्पित प्रेमभंगानं आलेली विकलता आणि तद्नंतर वास्तवाचा स्वीकार करतानाची प्रगल्भता.. या साऱ्या भावना त्यांनी सुंदर व्यक्त केल्या आहेत. उज्ज्वला जोग यांनी नर्मविनोदी शैलीत श्रीरंगची त्याच्या लग्नाच्या ध्यासानं पछाडलेली आई धमाल साकारली आहे. आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांनी ही भूमिका लक्षवेधी केली आहे.
संहितेत दोष असूनही उत्तम रंगमंचीय सादरीकरणानं प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं ‘लुकाछुपी’ चार घटका रंजनासाठी नक्कीच पाहायला हरकत नाही.