देशावरील करोनाचं संकट अजून टळलेलं नाही. त्यामुळे प्रत्येक देशवासीयाच्या डोक्यावर करोनाची टांगती तलवार आहेच. मात्र या कठीण प्रसंगामध्ये पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी ही सारी मंडळी त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. एकही दिवस सुट्टी न घेतला ते अहोरात्र जागत आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकावर त्यांचं उपकार आहेत. यासाठीच देशातील प्रत्येक नागरिक त्यांना शक्य होईल त्याप्रमाणे आभार मानण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठी कलाकारांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत अनेकांनी गाण्यांच्या माध्यमातून या योद्धांचं कौतुक केलं आहे. यामध्येच आता पुन्हा काही मराठी कलाकारांनी एकत्र येऊन या योद्ध्यांना सलाम केलं आहे. तसंच सध्या जे काही सुरु आहे ते लवकरात लवकर सुरळीत व्हावं यासाठी देवाकडे आर्त विनंतीही केली आहे.

‘तू परत ये’ या गाण्यातून अभिनेता समीर धर्माधिकारीसह अनेक कलाकारांनी देवाला आर्त विनंती केली आहे. या गाण्यातून प्रत्येक जण देवाकडे प्रार्थना करत असून देशावर, जगावर ओढावलेलं संकट दूर व्हावं यासाठी विनवणी करत आहे. सचिन दुबाले पाटील निर्मित या गाण्याचं दिग्दर्शन स्वरुप बाळासाहेब सावंत यांनी केलं आहे. तर सागर फडके यांचा आवाज या गाण्याला लाभला आहे.

“हे गाणं फार प्रेरणादायी आहे. या काळात आपण बऱ्याच गोष्टी मिस करत आहोत. मी मुंबईचा असल्यामुळे येथील गर्दी, ट्रॅफीक, मित्रांना भेटणं हे सारं काही मिस करतोय. त्यामुळे सध्याची परिस्थिती लवकर बदलावी, हीच माझी इच्छा आहे आणि याच भावना या गाण्यातूनही व्यक्त करण्यात आल्या आहेत”, असं प्रथमेश परब म्हणाला.

एस. सागर लिखित या गाण्यामध्ये समीर धर्माधिकारी, प्रथमेश परब, प्रणव रावराणे, अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, विजय आंदळकर, निखिल राऊत, सिध्देश्वर झाडबुके, जयेश चव्हाण आणि स्वरूप बाळासाहेब सावंत ही कलाकार मंडळी झळकली आहेत.