रणबीर कपूर आणि आपण पुढील वर्षी विवाह करणार असल्याच्या बातमीचा इन्कार करत या बातम्या म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे कतरिना कैफने सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुढील वर्षात म्हणजे २०१५मध्ये कतरिना कैफ आणि रणबीर कपूर विवाहबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांकडून ऐकायला मिळत आहेत. मात्र, रणबीर आणि माझा पुढील वर्षात विवाह करण्याचा कोणताही प्लॅन नसल्याचे कतरिना कैफने स्पष्ट केले आहे. तसेच आपल्याला याबद्दल काहीच कल्पना नसून, याबद्दल मला सर्वप्रथम प्रसारमाध्यमांकडून ऐकायला मिळाल्याचे कतरिना कैफने स्पष्ट केले. रणबीर कपूरने यापूर्वीच कतरिना कैफबरोबर असलेल्या आपल्या नात्याची कबुली दिली होती. त्यानंतर रणबीर आणि कतरिनाच्या नात्याबद्दल अनेक बातम्या प्रसारमाध्यमांकडून ऐकायला मिळत होत्या. मात्र, प्रसारमाध्यमांकडून प्रसारित केल्या जाणा-या अशाप्रकारच्या बातम्यांची आपल्याला आता सवय झाल्याचे सांगत कतरिना कैफने येणा-या वर्षात रणबीरशी विवाह करणार असल्याचा साफ इन्कार केला आहे.