रजत मुखर्जी दिग्दर्शित ‘उम्मीद’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. देशातला हा पहिला मेडीकल थ्रिलर असेल ज्यामध्ये बेकायदेशीर औषध चाचणीसारखा महत्त्वाचा विषय मांडण्यात आलाय. या चित्रपटात अंजली पाटील, पल्लवी दास, हर्ष छाया, यतिन कार्येकर, मिलिंद गुनाजी आणि दलिप ताहिल यांच्या भूमिका आहेत. औषधांच्या बेकायदा चाचण्यांमुळे होणारे मृत्यू, यातून चालणारा बेकायदेशीर व्यवसाय असे गंभीर मुद्दे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत.

‘या चित्रपटात अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा मांडण्यात आलाय. आफ्रिकेतही अशा प्रकारे औषधांच्या बेकायदा चाचण्या व्हायच्या. मात्र ‘द कॉन्स्टंट गार्डनर’ या चित्रपटानंतर तिथे अशा चाचण्या बंद झाल्या. ‘उम्मीद’ हा चित्रपट भारतातही अशा प्रकारचा बदल आणू शकेल अशी माझी अपेक्षा आहे,’ असं अभिनेता दलिप ताहिल म्हणाला.

परदेशी फार्मास्युटिकल कंपन्या ग्रामीण भारतातील गरिबांवर चुकीच्या पद्धतीने औषधांच्या चाचण्या करतात. ज्यामध्ये ४८ हजार मुलांना अर्धांगवायूचा झटका येतो आणि ११ हजार ५०० मुलांचा मृत्यू होतो. या चाचण्यांच्या बदल्यात लहान मुलांना या कंपन्या एक समोसा देतात. यांसारखे काही गंभीर मुद्दे या ट्रेलरमधून मांडण्यात आले आहेत.

वाचा : घराणेशाहीच्या मुद्द्यावर पुरेशी चर्चा झाली- कंगना रणौत

बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल कंपन्यांचे सत्य, भारतातील राजकारण, प्रसारमाध्यमांची भूमिका आणि फॅशन विश्व, या सर्वांचा एकमेकांशी असणारा संबंध चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. वेलकम फ्रेंड्स प्रॉडक्शन्स निर्मित ‘उम्मीद’ २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होईल.