चित्रपटतज्ज्ञांची समिती नियुक्त; परदेशातील तज्ज्ञांनीही सहभाग

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे ‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’अंतर्गत १९ व्या शतकातील मलाचा दगड ठरलेले चित्रपट विविध स्वरूपांमध्ये जतन करून ठेवण्यात आले आहेत. चित्रपटांच्या रिळांच्या संवर्धनासाठी डिजिटायझेशनचा पाच वर्षांचा प्रकल्प आहे. यामध्ये चित्रपटांच्या रिळांचे ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशी वर्गवारी करण्याचे काम डिसेंबपर्यंत मार्गी लागणार आहे. या सर्व प्रकल्पासाठी चित्रपटतज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली असून, परदेशातील तज्ज्ञांनीही सहभाग घेतला आहे. या प्रकल्पामध्ये लघुपटांचेही जतन करण्यात येणार आहे.

चित्रपटांचा ठेवा ही ऐतिहासिक संपत्ती आहे. त्याच्या जतन आणि संवर्धनासाठी भारत सरकारने ‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’ची स्थापना केली आहे. याअंतर्गत पाच वर्षांमध्ये एक हजार चित्रपटांच्या डिजिटायझेशन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. चित्रपटांच्या जतन आणि संवर्धनाचा भाग म्हणून चित्रपटांच्या रिळांची दुरुस्ती करून ती मूळ स्वरूपात जतन करण्यात येणार आहेत. त्यासाठी संग्रहालयामध्ये १९ ‘कोल्ड स्टोअरेज रॅक’ असून यामध्ये ३० टक्के आद्र्रता आणि दोन अंश सेल्सिअस तापमानात चित्रपट रिळांचे जतन केले जात आहे. या कोल्ड स्टोअरेज रॅकचीही तपासणी केली जात आहे, असे नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनचे विशेष कार्यकारी अधिकारी संतोष अजमेरा यांनी दिली. २०१० मध्ये ३५०हून अधिक चित्रपटांचे जतन तर, पाचशेहून अधिक चित्रपटांचे डिजिटायझेशन करण्यात आले होते. संग्रहालयामध्ये सुमारे एक हजार नायट्रेट फिल्म रिल्स आहेत. बराच कालावधी झाल्यामुळे आणि रासायनिक प्रक्रियेमुळे या रिळांचे नुकसान होत आहे. त्यामुळे चित्रपटांचा ठेवा जतन करण्यासाठी रिळांची तपासणी, दुरुस्ती आणि संवर्धन करण्यात येत आहे. सध्या संग्रहालयामध्ये १८ ते २० हजार चित्रपटांची सुमारे सव्वालाखांहून अधिक रिळे जतन करून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. डिजिटायझेशन झालेले पुन्हा रीळ स्वरूपात विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील अनेक वष्रे या चित्रपटांचे जतन होण्यास उपयुक्त ठरणार आहे. संग्रहालयाचा प्रकल्प जागतिक स्तरावर पथदर्शी ठरणार आहे, असेही अजमेरा यांनी सांगितले.

लघुपटांचेही जतन

रिळांच्या जतन आणि संवर्धनासह चार लघुपटांचे जतन करण्यावर भर देण्यात आला आहे. ‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’ अंतर्गत आम्ही विविध संस्था आणि व्यक्तींना त्यांच्याकडील लघुपट तसेच चित्रपटांचा दुर्मीळ वारसा संग्रहालयाकडे सुपूर्द करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. देशातील आणि परदेशातील चित्रपटतज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली असून, कोणत्या चित्रपटांचे जतन करावयाचे त्याचे विविध कसोटय़ांवर प्राधान्यक्रम ठरवण्यात आले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली.