अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या होणाऱ्या राजकीय आरोपांचा समाचार घेत आपण भाजपाने पेरलेल्या लोकांपैकी नसल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारविरोधात बोलण्यासाठी भाजपाकडून कंगनाचा वापर केला जात असल्याचा आरोप करणाऱ्या एका टीकाकाराला ट्विटवरुन कंगनाने उत्तर दिलं आहे. भाजपाच्या एखाद्या लोकप्रिय नेत्यापेक्षा माझे वार्षिक उत्पन्न अधिक असून मला सवंग लोकप्रियतेची गरज नसल्याचा टोला कंगनाने विरोधकांना लगावला आहे.

संजुक्ता बासू या लेखिकेने कंगानावर टीका करणारे ट्विट केलं. यामध्ये त्यांनी कंगना आणि आमिर खानची तुलना केली होती. “अनेकजण विचारत आहेत की उजव्या विचारसरणीचे लोकं कंगानाने मुंबईची तुला पाकव्याप्त काश्मीरशी केल्याबद्दल संताप व्यक्त करत नाही. जसा त्यांनी आमिर खानविरोधात केला होता. याचं उत्तर सोप्प आहे ना? आमिरचे वक्तव्य हे अल्पसंख्यांकावर हिंदुत्वावाद्यांकडून होत असणाऱ्या हिंसेसंदर्भात होतं. कंगना सध्या भाजपाच्या बाजूने महाराष्ट्र सकारवर टीका करत आहे,” असं बासू यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बासू यांच्या या टीकेला कंगनाने ट्विटरवरुनच उत्तर दिलं आहे. “भाजपाकडून पेरण्यात आलं आहे हा हा… मी दोन वेळा भाजपाचे तिकीट नाकारलं आहे. मी कंगना रणौत आहे. माझी लोकप्रियता आणि वार्षिक उत्पन्न हे अनेक यशस्वी नेते आणि राजकारण्यांपेक्षा अधिक आहे. तुम्ही कधीतरी तुमची बुद्धी का नाही वापरत मॅडम,” असा टोला कंगानाने बासू यांना लगावला आहे.

अन्य एका ट्विटला रिप्लाय देताना कंगाने, “एखाद्यावर कोणी प्रेम करत असेल त्याचे कौतुक करत असेल तर त्याच्या मोबदल्यात काहीतरी हवंच असता हे कोणतं धोरण आहे अनेकांचं मला कळत नाही. कोणत्याही हेतूशिवाय लोकं एखमांवर प्रेम करु शकतात. एकमेकांचं कौतुक करु शकतात. मी ज्या स्वातंत्र्यासहीत जगतेय ते त्याचे उत्तम उदाहरण आहे. टीका करणारे आणि निराशावादी लोकं होपलेस आहेत,” असं म्हटलं आहे.

मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्यानंतर झालेल्या वादावरुन बोलताना कंगनाने, ‘बरेच लोकं मला मुंबईत परत येऊ नकोस अशी धमकी देत आहेत. म्हणून मी येत्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा पोस्ट करेन. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबून दाखवा’ अशा आशयाचे ट्विटही केलं आहे.