दिलीप ठाकूर
ही गोष्ट उत्तर प्रदेश, बिहार येथील ग्रामीण भागातील एका गावातील आहे, अगदी संक्षिप्त स्वरुपात सांगायची तर, ओमकार (इंद्र ठाकूर) आणि रुपा (मिताली) यांचा सुखाचा संसार सुरू आहे . त्याना एक छोटा मुलगा आहे आणि आता रुपा पुन्हा गरोदर असताना रुपाची बहिण गुंजा ( साधना सिंग) तिच्याकडे राह्यला येते. ती या घरात राहायला आली असतानाच तिची ओळख ओमकारचा भाऊ चंदन (सचिन पिळगावकर) याच्याशी होते. या ओळखीचे रुपांतर प्रेमात होते, हे रुपा ओळखते आणि त्यांचे लग्न करून देईन म्हणते. पण काही दिवसांतच एका अपघातात रुपाचे निधन झाल्याने रुपाचे वैद्य वडिल आणि ओमकारचेही शेतकरी वडिल रुपाच्या मुलाचे योग्य पालनपोषण व्हावे आणि ओमकारचेही जीवन सांभाळून जावे म्हणून गुंजाचे लग्न ओमकारशी व्हावे असा निर्णय घेतात. पुढे ही गोष्ट असे काही वळण घेते की, चंदन व गुंजा यांचे लग्न होते.

राजश्री प्रॉडक्शनचा चित्रपट असल्याने त्याचा शेवट गोड गोड होणार हे स्वाभाविक आहे. ही गोष्ट गोविंद मुनिस दिग्दर्शित ‘नदीया के पार’ (१९८२) या चित्रपटाची आहे. पण तुम्हाला राजश्री प्रॉडक्शनच्या अशाच एका सुपरहिट चित्रपटाची आठवण आली असेलच. सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन’ (१९९४) ची आठवण आली ना? ‘नदिया के पार’ची ‘हम आपके…’ शहरी आणि चकाचक रिमेक. आणि राजश्री प्रॉडक्शनने हे सगळे करताना ग्रामीण भागात (मूळ चित्रपट) आणि शहरी भाग (अर्थात रिमेक) अशा दोन्ही बाजूंनी भरभरून यश मिळविले.

‘नदिया के पार’ हा चित्रपट केशव प्रसाद मिश्रा यांच्या ‘कोहबर की शर्त’ या कादंबरीवर आधारित. चित्रपटाची भाषा भोजपुरी आणि अवधी यांचे मिश्रण. राजश्री प्रॉडक्शनचे वितरण आणि प्रदर्शन याचे जाळे अतिशय चांगले आणि दर्जेदार त्यामुळे या चित्रपटाने उत्तर भारतात धो-धो यश मिळविले. मुंबईत मात्र हा चित्रपट फारसे यश मिळवून आपले अस्तित्व सिद्ध करु शकला नाही. चित्रपटाचे गीत व संगीत रवींद्र जैन यांचे होते. ‘कौन दिसा में लेके चला रे’, ‘जब तक पुरे ना हो सपने’ ही गाणी लोकप्रिय झाली. चित्रपटात राम मोहन, लीला मिश्रा इत्यादी कलाकार आहेत.
आपल्या सचिन पिळगावकरची हिंदी चित्रपटातील वाटचाल अगदी बालकलाकारपासूनची, त्याच्या कारकिर्दीतील हा सुपरहिट चित्रपट आहे. साधना सिंगचा हा पहिलाच चित्रपट होय.

असो. रिमेकने एका भाषेतील चित्रपट दुसर्‍या भाषेत जातात, काही त्याच भाषेत बनतात. त्यातील काहींचे रंगरुप एकदम झकास होते, त्यातील ही एक ओळखीची गोष्ट.