विनोदी भयपटाच्या चाहत्‍यांना लवकरच मनोरंजनाची नवीन पर्वणी मिळणार आहे. राष्‍ट्रीय पुरस्‍कार विजेते दिग्‍दर्शक शिवाजी लोटन पाटील व लोकप्रिय अभिनेता प्रियदर्शन जाधव डिजिटल विश्वात पदार्पण करत आहेत. ‘भूताटलेला’ असं या वेब सीरिजचं नाव असून जूनच्या पहिल्‍या आठवड्यामध्‍ये मराठी व हिंदी भाषेमध्‍ये तो प्रदर्शित केला जाणार आहे. हंगामा डिजिटल मीडिया व कॅफे मराठी यांची निर्मिती असलेल्‍या या वेब सीरिजचे लेखन योगेश शिरसाट यांनी केले आहे. तर त्यात प्रियदर्शनसोबत सुरभी हांडे व सायली पाटील हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

याविषयी शिवाजी लोटन पाटील म्‍हणाले, ”ओटीटी व्‍यासपीठांनी कथानकाचे नवीन विचार, संकल्‍पना व स्‍वरूपांसह प्रयोग करण्‍यासाठी व्‍यापक मुभा दिली आहे. मी प्रियदर्शनसोबत डिजिटल विश्‍वामध्‍ये पदार्पण करण्‍यासाठी खूप उत्‍सुक आहे. यापूर्वी मी त्‍याच्‍यासोबत ‘हलाल’ चित्रपटामध्‍ये काम केले आहे. या शोमध्‍ये हास्‍य व थरार यांचे उत्तम संयोजन आहे आणि प्रेक्षक या शोची कथा व कलाकारांचा अभिनय पाहून निश्चितच सीरिजचं भरभरून कौतुक करतील.”

आणखी वाचा : लोकांना आता तुला व्हिलन म्हणून पाहायचं नाहीये; यावर सोनू सुद म्हणतो….

आपल्‍या डिजिटल पदार्पणाबाबत बोलताना प्रियदर्शन म्‍हणाला, ”ओटीटीवर विविध शैलींमधील अनेक कथा सादर केल्या जातात आणि या कथा आता मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. हे व्यासपीठ कलाकारांना देखील त्‍यांची कौशल्‍ये वाढवण्‍याची, विविध प्रकारच्‍या भूमिका साकारण्‍याची आणि त्‍यांच्‍यामधील वैविध्‍यता दाखवण्‍याची संधी देतात. मला अशा रोमांचक कथेचा भाग बनण्‍याची संधी मिळाली तसेच या शोमुळे पुन्‍हा एकदा शिवाजीसोबत काम करण्‍यास मिळालं, त्यामुळे मी खूप खूश आहे.”

‘भूताटलेला’ ही सीरिज हंगामा प्‍लेवर प्रदर्शित होणार आहे.