राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशनंतर आता बिहारमध्ये ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक जोपर्यंत ‘पद्मावती’वर स्पष्टीकरण देणार नाही, तोपर्यंत बिहारमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

दरम्यान, सरकारमधील महत्त्वाच्या पदांवर असणाऱ्या व्यक्तींनी एखाद्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून मंजुरी मिळण्यापूर्वीच त्याविषयी वक्तव्य करणे अयोग्य असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने मंगळवारी केंद्र सरकारला फटकारले. सुप्रीम कोर्टाला न जुमानता नितीश कुमार यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदीची घोषणा केली. याआधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी त्यांच्या राज्यात ‘पद्मावती’वर बंदीची घोषणा केली होती.

वाचा : शिल्पा शिंदेनंतर दुसरी अंगुरी भाभीसुद्धा शो सोडणार?

इतिहासाची मोडतोड करून चित्रपट निर्मिती केल्याचा आरोप दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यावर राजपूत संघटनांकडून करण्यात येत आहे. भन्साळी आणि चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोणला करणी सेनेकडून जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. या सर्व वादाच्या पार्श्वभुमीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलण्यात आली.