scorecardresearch

बाहेरून आला आणि तिखट झाला..

मध्यंतरी कार्तिक आर्यन या सध्या लोकप्रिय असलेल्या अभिनेत्याने करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सचा दोस्तान्हा हा चित्रपट अध्र्यावरच सोडला आणि कोण गहजब झाला.

गायत्री हसबनीस
मध्यंतरी कार्तिक आर्यन या सध्या लोकप्रिय असलेल्या अभिनेत्याने करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सचा दोस्तान्हा हा चित्रपट अध्र्यावरच सोडला आणि कोण गहजब झाला. त्याची कारकीर्द संपली इथपासून ते तोही सुशांत सिंह राजपूतसारखा घराणेशाहीचा शिकार झाला असे बोलले गेले. तो मात्र शांतपणे काम करत राहिला. आता त्याचा भूलभुलैय्या २ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. यानिमित्ताने बोलताना ना आपण बॉलीवूडच्या घराणेशाहीचे शिकार झालो ना आपल्याला काही वेगळी वागणूक मिळाली असे तो स्पष्ट करतो.
‘‘मी स्वत: एक आशावादी माणूस आहे आणि बॉलीवूडसारख्या विश्वात जर यायचे असेल तर बाहेरून येणाऱ्यांनीही आशावादी राहायला हवे’’, असा सल्ला देत बॉलीवूडमधील घराणेशाहीचा थेट उल्लेख न करता आपल्याला इथे कसलीच वेगळी वागणूक मिळाली नाही असे कार्तिक सांगतो.
‘‘अनेकदा गैरसमज, गैरसंवादही बॉलीवूडमध्ये काम न मिळण्यासाठी कारणीभूत ठरतात, पण या सगळय़ांना बगल देत पुढे जाणे गरजेचे आहे’’, असे कार्तिकने पुढे सांगितले. ‘‘मी मेहनतीवर फार जास्त विश्वास ठेवतो. आपण या क्षेत्रातले नाही, बाहेरून आलेलो आहोत, पण आपल्याला इतरांप्रमाणे या क्षेत्रात यशस्वी होण्याची इच्छा आहे. अशावेळी बॉलीवूडमध्ये घराणेशाही आहे, इथे हे असेच चालते मग आपल्याला इकडे संधी मिळेल की नाही?, याबद्दलही आपल्या मनातही शंका घर करायला लागतात. खरंतर अशी कुठलीही शंका न घेता आपण पूर्ण आत्मविश्वासाने इथे आले पाहिजे’’, असे तो आग्रहाने सांगतो. ‘‘माझ्यासारखा बाहेरून आलेला मुलगा जर इतके यश बॉलीवूडमध्ये मिळवू शकतो तर माझ्याप्रमाणे कोणीही मिळवू शकतो. मी जेव्हा या क्षेत्रात आलो तेव्हा एका खोलीत आम्ही बारा जण राहायचो. त्यावेळेला त्या बारांपैकी कितीतरी जण आपली बॅग भरून परत आपल्या गावी निघूनही गेले आहेत. मी असा मागे फिरलो नाही आणि हेच कदाचित या माझ्या यशाचे इंगित आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. माझ्या समकालीन स्पर्धकांकडे माझेही लक्ष असते. आपण प्रामाणिकपणे काम केले तर ते निर्मात्यांच्या नजरेत भरते आणि आपले संबंधही चांगले प्रस्थापित होतात, त्यातून पुढील चित्रपटही मिळणे सोपे जाते’’, अशी ग्वाहीही यावेळी त्याने स्वानुभवातून दिली. खरंतर कार्तिकने त्याचा निर्माण केलेला चाहतावर्ग, एकामोगा एक चित्रपटातून मिळालेले व्यावसायिक यश अशा अनेक बाबींमुळे सध्या तो लोकांच्या गळय़ातला ताईत बनला आहे. भुलभूलैय्या २’ या चित्रपटाच्या निमित्ताने कार्तिक एका नव्या ढंगात दिसतो आहे. या चित्रपटाची लोकप्रियता पाहता प्रेक्षकांप्रमाणेच कार्तिकही या नव्याकोऱ्या चित्रपटाची वाट पाहतो आहे. २००७ साली सुपरस्टार अक्षय कुमारच्या ‘भूलभुलैय्या’ने थरार आणि विनोद या दोघांचा समतोल व्यवस्थित राखत प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते त्यामुळे यावेळी तब्बल पंधरा वर्षांनंतर अवतरणाऱ्या ‘भूलभुलैय्या २’ मध्येही थरार आणि विनोदाची सरमिसळ आहे, जी बाब या सिक्वेलपटासाठीही आकर्षक असल्याचे यावेळी कार्तिकने स्पष्ट केले. ‘‘हॉरर कॉमेडी ही धाटणी मी पहिल्यांदाच करतोय. याआधी अनेक विनोदी चित्रपटांतून काम केल्यानंतर विनोदी व्यक्तिरेखांमधून काम करण्याचा मला अनुभव आहे, पण भीती अभिनयातून दाखवणं हाही तितकाच आव्हानात्मक भाग आहे. या संपूर्ण चित्रपटाच्या निमित्ताने मला थरारासह विनोदाचाही बाज अनुभवता आला याचे मला समाधान वाटते’’, असे त्याने सांगितले.
कंगनाशी स्पर्धा नाही..
‘भूलभुलैय्या ’ च्या प्रदर्शनावेळी अभिनेत्री कंगना राणावतचा ‘धाकड’ हा चित्रपटही प्रदर्शित होतो आहे. त्याबद्दल बोलताना आपल्याला या चित्रपटाची झलक आवडली असल्याचे कार्तिकने सांगितले. सध्या चित्रपट चांगले चालत असून ‘भूलभुलैय्या २’सह ‘धाकड’ या चित्रपटालाही प्रेक्षकांची पसंती मिळेल अशी आशाही त्याने व्यक्त केली. कंगनाबरोबर काम करण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली.
भूलभुलैय्या गाण्याची मलाही उत्सुकता..
‘तेरी आखे भूलभुलैय्या’ हे गाणं आजही कित्येक जणांच्या अंगावर शहारे आणते. ‘भूलभुलैय्या २’च्या निमित्ताने हे गाणेही नव्या ढंगात कार्तिकवर चित्रित केले आहे, तेव्हा हा अनुभव कसा होता याबद्दल कार्तिक म्हणतो, ‘‘भूलभुलैय्या २ या चित्रपटात गाणी नाही असे होणार नाही. तेव्हा या चित्रपटाचा नायक म्हणून हे गाणे आपल्या दुसऱ्या भागात असेल ना? याची खात्री मी दिग्दर्शकांकडून करून घेतली होती. या गाण्यातून दोन गोष्टी साध्य झाल्या आहेत, एक म्हणजे ‘भूलभुलैय्या’च्या जुन्या गाण्याची ती आठवण प्रेक्षकांना करून देणे आणि त्यातूनच हे गाणे आजच्या पिढीचे वाटावे म्हणून तशी रूपरचना नृत्यातून करणे’’, असे कार्तिकने स्पष्ट केले.
संघर्ष असाही..
‘प्यार का पंचनामाह्णसारख्या चित्रपटापासून आतापर्यंत झालेला त्याचा प्रवास सगळय़ांच्याच नजरेत भरणारा असून याचे स्वत: कार्तिकलाही अप्रुप वाटते. ‘‘मला या प्रवासात चांगले दिग्दर्शक मिळाले ज्यांना विश्वास वाटला की माझ्या खांद्यावर ते संपूर्ण चित्रपट टाकू शकतात आणि मी तो पेलू शकतो. मीही बऱ्याचदा माझी प्रगती पाहून सुखावतो’’, असेही त्याने यावेळी सांगितले. ‘प्यार का पंचनामा’ हा चित्रपट आला त्यावेळी कोणालाच माहिती नव्हते मीही एक अभिनेता आहे. लोकांनी मला ‘सोनू के टिटू की स्विटी’ या चित्रपटापासून ओळखायला सुरुवात केली. त्यामुळे संघर्ष मलाही चुकला नाही. ‘प्यार का पंचनामा २’ या चित्रपटानंतरही मी ऑडिशन्स द्यायचो तसेच मला प्रेक्षकांनी ओळखायला सुरुवात केल्यावरही मी कास्टिंग दिग्दर्शकांकडे रांगेत उभा राहायचो. तेव्हा अशा अनेक गोष्टी आपल्या करिअरच्या टप्प्यात होत असतात. करिअरच्या यशस्वी पथावर मग प्रेक्षकांच्या अपेक्षाही वाढतात आणि त्यात समतोल राखणे कठीण असते’’, हेही त्याने कबूल केले. ‘शहेजादा’, ‘फ्रेडी’ असे दोन चित्रपट, साजिद नाडियादवाला, समीर विद्वांस अशा दिग्दर्शकांचे चित्रपट आणि हंसल मेहता यांचा ‘कॅप्टन इंडिया’ अशा चित्रपटातून काम करत असल्याचेही त्याने सांगितले.
‘भूलभुलैया २’ची घोषणा झाल्यानंतर अनेकांनी माझी आणि अक्षय कुमार यांची तुलना केली असणार, पण मी या तुलनेचा फारसा विचार करत नाही. ते खूप मोठे सुपरस्टार आहेत आणि त्यांचा ‘भूलभुलैय्या’ पूर्णत: वेगळा होता. हा सिक्वेलपट जरी असला तरी माझ्यासाठी हा चित्रपट नवा आहे. या चित्रपटाची कहाणी वेगळी आहे आणि अनेक अशी नवीन पात्रेही या चित्रपटात आहेत. जुन्या ‘भूलभुलैय्या’ची ती दुनिया पुनरुज्जीवित केली आहे, पण गोष्ट पूर्ण वेगळी आहे, म्हणूनच अक्षय कुमार यांच्यासारखेच माझे पात्र नसून त्याचे व्यक्तिचित्रणही वेगळे करण्यात आले आहे – कार्तिक आर्यन

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Outside became spicy popular actor production bollywood amy

ताज्या बातम्या