संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती सिनेमावरची संकटं काही केल्या कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीत. सिनेमात अलाउद्दीन खिल्जीची व्यक्तिरेखा साकारलेल्या रणवीर सिंगने आतापर्यंत याविषयावर कोणतेही भाष्य करणे टाळले होते. पण आता त्यानेही आपले मत मांडले आहे. पद्मावतीशी निगडीत वादात तो २०० टक्के सिनेमाच्या आणि दिग्दर्शकाच्या बाजूने असल्याचे रणवीर म्हणाला.

पद्मावती सिनेमावर सुरू असलेल्या वादाबद्दल त्याला प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, हा फार संवेदनशील विषय आहे. यावर मला काहीही बोलण्याची मनाई केली आहे. या विषयावर जो काही निर्णय होईल तो सिनेमाच्या निर्मात्यांकडून तुम्हाला सांगण्यात येईल.

राजपूत समुदायांकडून पद्मावतीला फार विरोध केला जात आहे. राजपुतांच्या मते, या सिनेमातून राणी पद्मावतीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सगळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘ग्लोबल आंत्रप्रेनरशिप समिट’ कार्यक्रमाला उपस्थिती लावणार होते त्या कार्यक्रमाला दीपिकाने न जाण्याचा निर्णय घेतला. दीपिकाने मात्र सरकारने या प्रकरणात लक्ष न घातल्यामुळे या रोषापोटीच कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

या कार्यक्रमाशी संबंधित एका व्यक्तीने माध्यमांना ही माहिती दिली. मुख्य म्हणजे या संमेलनात दीपिका ‘हॉलिवूड टू नॉलिवूड टू बॉलिवूड: द पाथ टू मुव्हीमेकिंग’ या सेशनमध्ये भाषणही करणार होती. पण, तिने या कार्यक्रमालच जाण्यास नकार दिल्याने आयोजकांपुढेही मोठा पेच उभा राहिला आहे.