बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. राजकारण असो किंवा समाजकारण विविध मुद्दयांवर ते आपलं मत मांडत असतात. बेधडक वक्तव्य केल्यामुळे अनेकदा ते चर्चेतही आले आहेत. नसीरुद्दीन शाह यांच्यानंतर आता त्यांची पत्नी म्हणजेच अभिनेत्री रत्ना पाठक शाह त्यांच्या एका वक्तव्यामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. रत्ना पाठक यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियातून संताप व्यक्त केला जातोय.

नुकत्याच पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत रत्ना पाठक शाह यांनी मनमोकळेपणाने विविध मुद्दयांवर त्यांचे विचार मांडले. यावेळी मात्र त्यांनी करावचौथच्या परंपरेला अंधविश्वास म्हंटलं. त्यांच्या या वक्तव्याने सध्या त्यांना टीकेला सामोरं जावं लागतंय.

पिंकविलाच्या मुलाखतीत रत्ना पाठक यांना कधी त्यांनी पतीच्या दिर्घायुष्यासाठी एखादं व्रत किंवा उपवास केलाय का, असा सवाल विचारण्यात आला होता. यावर त्या म्हणाल्या, “असले व्रत करायला मी वेडी नाही. सुशिक्षित महिलादेखील पतीच्या दिर्घायुष्यासाठी असले व्रत करतात ही खुप आश्चर्याची गोष्ट आहे. खरं तर भारतात एका विधवेला भयाण आयुष्य जगावं लागतं आणि याच भितीपोटी महिला असले व्रत करतात. २१व्या शतकात आपण असल्या गोष्टी करतो हे खरचं दूर्दैव आहे.”

पाहा व्हिडीओ –

हे देखील वाचा : Loksatta Exclusive : “मी टाईमपास म्हणून लग्न केलं अन् आता…” : संजय नार्वेकर

आपले विचार मोकळेपणाने मांडत असताना रत्ना पाठक पुढे म्हणाल्या, “आपण अत्यंत पुराणमतवादी आणि रुढीवादी समाजाकडे वाटचाल करत आहोत. इथं महिलांवर कायम ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. जगातील कोणत्याही पुराणमतवादी समाजाकडे पाहा, सगळीकडे प्रथम महिलांवर ताशेरे ओढले जातात. . सौदी अरेबियाकडेच बघा ना, आपण त्याच दिशेने वाटचाल करत आहोत.”असं म्हणत रत्ना पाठक यांनी महिलांच्या वाट्याला येणाऱ्या जाचक रुढी परंपरांवर आपलं मत मांडलं.

रत्ना पाठक यांनी बेधडकपणे त्यांचं मत मांडलं असलं तरी अनेकांना त्यांचे विचार पटलेले नाही. अनेक महिलांनीच सोशल मीडियावरून त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केलीय. खास करून ‘सुशिक्षित महिलाही असले व्रत करतात’ या त्यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय. तसचं बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कायम हिंदू प्रथा परंपरांचा विरोध करत आल्याचं म्हणत सोशल मीडियावर रत्ना पाठक यांच्या वक्तव्यावर निषेध व्यक्त केला जातोय.