प्रत्यक्ष वयापेक्षा मोठ्या वयाच्या भूमिका माझ्या वाटेला येत असल्या तरी मी त्याचा आनंद घेत असून याबाबत मी संजीव कुमार आहे असंच म्हणायला हवं, असं प्रांजळ मत सचिन खेडेकर यांनी व्यक्त केलं. किंबहुना अशा भूमिका साकारण्यास मला आवडतात असं ते म्हणतात. ‘संजीव कुमारनेदेखील त्याच्या तरुणपणात अशा पध्दतीनेच मोठ्या वयाच्या भूमिका साकारल्या आणि मीदेखील तेच करतोय,’ असं ते सांगतात.

प्रसिद्ध दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बापजन्म’ चित्रपटाचा फर्स्ट लूकच्या वेळी सचिन खेडेकर बोलत होते. ‘मराठीत तरुण भूमिका शक्यतो उपग्रह वाहिनीवरील मराठी मालिकेत असतात. मधल्या वयाच्या भूमिका कितपत वाटेला येतील काही सांगू शकत नाही. पण अशा प्रत्यक्ष वयापेक्षाही मोठ्या वयाच्या भूमिका साकारण्यातही वेगळाच अनुभव व आनंद आहे,’ असं ते यावेळी म्हणाले.

‘भूमी’मधील ‘लग जा गले’ हे गाणं ऐकलं का?

‘एफयू’, ‘मुरांबा’, ‘कच्चा लिंबू’नंतर त्यांचा ‘बापजन्म’ हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबद्दल सांगताना, ‘मुलगा आणि पिता या नात्यावर आधारित हा चित्रपट असून यामध्ये संवेदनशीलता ठासून भरली आहे,’ असं ते म्हणाले. पुष्कराज चिरपूटकर यामध्ये मुलाची भूमिका साकारणार आहे. ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सुमतीलाल शाह व सिक्टीन बाय फोर प्रॉडक्शन्सने केली आहे. यामध्ये पुण्याची पार्श्वभूमी असल्याने चित्रीकरण हे पुण्यातच झाले. चित्रपटात शर्वरी लोहकरे, सत्यजित पटवर्धन व आकाश खुराणा यांच्याही भूमिका आहेत.